मोबाईलमध्ये गेम खेळण्यास नकार दिल्याने वडिलांचा खून

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

कायम मोबाईमध्ये गेम खेळण्यात व्यस्त पाहणाऱ्या मुलाला समज दिल्याने व नवीन मोबाइल घेण्यास पैसे न दिल्याच्या रागातून रागाच्या भरात मुलाने वडिलांचा खून केला.

बेळगाब : कायम मोबाईमध्ये गेम खेळण्यात व्यस्त पाहणाऱ्या मुलाला समज दिल्याने व नवीन मोबाइल घेण्यास पैसे न दिल्याच्या रागातून रागाच्या भरात मुलाने वडिलांचा खून केला. मुलाने वडिलांचे शिर धडावेगळे केले.

शंकऱ्याप्पा रेवप्पा कुंभार (६१, सिद्धेश्वर गल्ली, काकती) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी त्यांचा मुलगा रघुवीर कुंभार (वय २१) याला अटक केली आहे.

रघुवीर हा मेकॅनिकल डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. त्याला मोबाईलचे मोठया प्रमाणात वेड होते त्यामुळे कायम मोबाईल मध्ये व्यस्त असायचा. यामुळे वडिलांनी त्याला अनेकदा समज दिली. तो सतत पब-जी गेम खेळत होता. शिवाय वडिलांकडे नवीन मोबाईलसाठी पैसेदेखील मागत होता. परंतु, वडील देत नसल्याने तो चिडचिड करत होता. याच रागातून रघुवीरने रविवारी शेजारील घरांच्या खिडक्यांवर दगडफेक केली होती. त्यामुळे हे प्रकरण पोलिसात गेले होते. 

रविवारी रात्री घरी आल्यानंतर बाराच्या सुमारास मुलगा पुन्हा मोबाईलमध्ये मग्न झाला. हे पाहून वडिलांनी त्याला पुन्हा फैलावर घेतले. याचाच राग धरून मुलाने आज पहाटे आई महादेवी यांना एका खोलीत कोंडले. वडिलांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. वडील त्याला आवरण्याचा प्रयत्न करत असताना त्याने वडिलांच्या गळ्याला धरत ढकलून खाली पाडले. यानंतर, घरातील विळीने त्यांच्या गळ्यावर वार केला. क्रूर बनलेल्या मुलाने नंतर वडिलांचे शीर धडावेगळे केलेच. शिवाय त्यांचा उजवा पायदेखील तोडला घटनेची माहिती मिळताच काकतिचे पोलिस निरीक्षक श्रीशैल कौजलगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father murdered for refusing to play games in mobile