प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी 

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

आमच्या दोघांच्या विचारांत आणि मतांमध्ये आमूलाग्र फरक असतानाही आम्ही परस्परांशी सहकार्याने वागलो. आम्ही आमची मते केवळ स्वत:पुरती मर्यादित ठेवली होती, ती लादण्याचा प्रयत्न केला नाही.

नवी दिल्ली - प्रथमच मी दिल्लीत आलो तेव्हा मला मार्गदर्शन करण्यासाठी येथे प्रणवदा होते, त्यांचेच बोट पकडून मला दिल्लीमध्ये स्थिरस्थावर होता आले. अगदी वडिलांप्रमाणे त्यांनी माझी काळजी घेतली, ते नेहमीच मला प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला देत असत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ते राष्ट्रपती भवनात "प्रेसिडेंट- ए- स्टेटमेंट' या पुस्तकाच्या प्रकाशनसमारंभात बोलत होते. या कार्यक्रमास राष्ट्रपती भवन, संसदेतील अनेक बडे अधिकारी आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. 

मोदी म्हणाले, "राष्ट्रपतिपद हे प्रोटोकॉलपेक्षाही मोठे असते, या पुस्तकातील छायाचित्रांमधून प्रणवदांची मानवतावादी बाजू दिसून येते. आणीबाणीच्या काळामध्येही मला भिन्न विचारसरणीच्या अनेक नेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांची मते जाणून घेता आली.'' 

या वेळी राष्ट्रपती मुखर्जी यांनीही मोदींवर स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले, "आमच्या दोघांच्या विचारांत आणि मतांमध्ये आमूलाग्र फरक असतानाही आम्ही परस्परांशी सहकार्याने वागलो. आम्ही आमची मते केवळ स्वत:पुरती मर्यादित ठेवली होती, ती लादण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे याचा आमच्या वैयक्तिक संबंधांवर फारसा परिणाम झाला नाही.''

Web Title: 'Like A Father': PM Modi Turns Emotional At Event For President Pranab Mukherjee