यूपीत दहशतीचे वातावरण : अखिलेश यादव

पीटीआय
बुधवार, 11 जुलै 2018

बागपतच्या तुरुंगात सोमवारी माफिया डॉन मुन्ना बजरंगी याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. मुन्ना बजरंगीच्या हत्येमुळे अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या कामगिरीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये आज कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. सर्वत्र दहशतीचे वातावरण असल्याचा आरोप आज माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला. बागपत जिल्ह्यातील तुरुंगात माफिया डॉनची झालेल्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली आहे. 

बागपतच्या तुरुंगात सोमवारी माफिया डॉन मुन्ना बजरंगी याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. मुन्ना बजरंगीच्या हत्येमुळे अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या कामगिरीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. अखिलेश यादव यांनी ट्‌विट करताना म्हटले, की उत्तर प्रदेशात गुन्हेगारांची हिंमत एवढी वाढली आहे, की ते तुरुंगात हत्या घडवून आणत आहेत. हे सरकारचे अपयश आहे. उत्तर प्रदेशचे नागरिक भयभीत झाले आहेत. एवढी अराजकता उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. 

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी अखिलेश यादव यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था निश्‍चितच चांगली असल्याचे सांगताना समाजवादी पक्षाच्या काळातील स्थितीची माहिती दिली. राज्यभरातील गुंडांना मुसक्‍या बांधण्याचे काम आदित्यनाथ सरकारने केले असल्याचे ते म्हणाले. बजरंगीच्या हत्येप्रकरणी कारागृह प्रमुख, उप्रमुख, हेड वॉर्डन आणि वॉर्डन यांना निलंबित केले असून, प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: In UP Fear Situations says Akhilesh Yadav