पुरुषी राजकारणातील फियरलेस लेडी...

धनंजय बिजले
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

पुरूषांनी व्यापलेल्या राजकारणात जयललिता यांनी केवळ भक्कम पायच रोवले नाहीत तर अखेरपर्यंत त्यांनी सर्वांना आपल्या तालावर नाचवले. "फियरलेस लेडी' अशी स्वतःची प्रतिमा त्यांनी उभी केली आणि अखेरपर्यत निभावली. त्याचवेळी गरिबांसाठी मात्र त्या लाडक्‍या अम्मा बनल्या.

पुरूषांनी व्यापलेल्या राजकारणात जयललिता यांनी केवळ भक्कम पायच रोवले नाहीत तर अखेरपर्यंत त्यांनी सर्वांना आपल्या तालावर नाचवले. "फियरलेस लेडी' अशी स्वतःची प्रतिमा त्यांनी उभी केली आणि अखेरपर्यत निभावली. त्याचवेळी गरिबांसाठी मात्र त्या लाडक्‍या अम्मा बनल्या.

तमिळनाडूत असे म्हटले जाते की, जयललिता यांचा सर्वांत मोठा मतदारसंघ कोणता असेल तर तो म्हणजे तमाम महिला वर्ग....राज्यातील महिला जयललिता यांच्यामागे अखेरपर्यंत मोठ्या मनाने उभारल्या. त्यांच्या साऱ्या चुका पोटात घालत त्यांनी जयललिता यांना भरभरून प्रेम दिले. भारतीय आणि जागतिक राजकारण हे आजही पुरूषसत्ताक मानले जाते. अशा या पुरूषांनी व्यापलेल्या राजकारणात जयललिता यांनी केवळ भक्कम पायच रोवले नाहीत तर अखेरपर्यंत त्यांनी सर्वांना आपल्या तालावर नाचवले. फियरलेस लेडी अशी स्वतःची प्रतिमा त्यांनी उभी केली आणि अखेरपर्यत निभावलीदेखील. मात्र त्याचवेळी गरिबांसाठी मात्र त्या लाडक्‍या अम्माही बनल्या.

राजकारण हा महिलांचा प्रांत नाही हा समज त्यांनी खोटा ठरविला. सिनेमाची पार्श्वभूमी, लहरी स्वभाव अशा साऱ्या नकारात्मक बाबींना मागे सारत त्यांनी तमिळनाडूत तमाम जनतेच्या मनात अम्मा हे अढळ स्थान पटकावले. वाट चुकलेली महिला असे त्यांचे वर्णन विरोधक करीत. मात्र या टीकेला भीक न घालता त्यांनी आपली प्रतिमा लार्जर दॅन लाईफ अशी बनविली. तमाम पुरुष राजकारण्यांना एक महिला पुरून उरते याचे विशेषतः महिला वर्गाला मोठे कौतुक वाटायचे. त्यामुळे त्यांच्या साऱ्या चुका पोटात घालत जनता त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने नेहमी उभी राहिली. याच्या जोरावरच आपल्या पोएस गार्डन येथील आलिशान निवासस्थानात बसून जयललिता यांनी साऱ्या राज्यावर गेली तीन दशके हुकूमत गाजविली.

अवघ्या दोन वर्षांच्या असताना पितृछत्र हरपलेल्या जयललिता लहानाच्या मोठ्या झाल्या त्या आईच्या सावलीत. त्यामुळे माझ्या जीवनात माझ्या आईचा खूप मोठा प्रभाव आहे असे त्या म्हणत. त्यानंतर त्यांच्यावर प्रभाव राहिला तो अर्थातच एम. जी. रामचंद्रन यांचा. अनेकांना माहिती नसेल पण देशात शालेय पोषण आहाराची योजना जर सर्वप्रथम कोणी सुरू केली असेल तर ती एम. जी. रामचंद्रन यांनी. लहानपणी गरिबीचे चटके सोसलेल्या या नेत्याने सत्ता मिळताच प्रथम शाळांमध्ये गरीब मुलांसाठी ही योजना सुरु केली. आज ती साऱ्या देशात राबविली जाते. त्याच पावलावर पाउल टाकत जयललिता यांनीही सतत लोकोपयोगी योजना राबविल्या. त्यावरुन त्यांना टिकेचे धनी व्हावे लागले. पण त्याची त्यांनी कधीही फिकीर केली नाही.

गरिबांच्या कल्याणाची भाषा सारेच राजकारणी करतात. पण शब्दांपेक्षा कृती अधिक बोलते हे जयललिता यांना पुरते ठावूक होते. त्यामुळे त्यांनी गरिबांसाठी अनेक योजना राबविल्या. राज्यात अम्मा कॅंटिन सुरु केले. येथे केवळ पाच रुपयांत भरपेट नाश्‍ता व जेवण मिळत असे. येथे जेवून तृप्त होणारी गरीब जनता मनातून अम्मांना भरभरुन आशिर्वाद देत असे. खाल्लेल्या मिठाला जागावे ही म्हण प्रचलित आहे. आज तमिळनाडूत घरांघरात अम्मा साल्ट आहे. मध्ये जेव्हा बाजारात रुपये किलो मीठ होते तेव्हा त्यांनी रुपये किलो दराने अम्मा मीठ देण्यास सुरुवात केली. राज्यांत दहा रुपयांत अम्मा मिनरल वाटर मिळते. जयललिता यांची छबी असलेले हजार रुपयांचे लॅपटाप त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना मोफत दिले. आज राज्यातील अनेक रुग्णांलयात अम्मा फार्मसी आहे. तेथे स्वस्त दरात औषधे मिळतात. तेथे शिशूंसाठी अम्मा बेबी किट मोफत मिळते. गरिबांना घर बांधण्यासाठी स्वस्त दरात अम्मा सिमेंट मिळते. गरीब महिलांना त्यांनी मोफत मिक्‍सर वाटप केले. एवढेच नाही तर राज्यात सात मोठ्या थिएटरमध्ये अम्मा तिकीट योजनेत गरीबांना स्वस्त दरात सिनेमा पाहता येतो. या साऱ्या योजनांमुळे त्यांनी गरिबांच्या अम्मा हे बिरुद सार्थ ठरविले.

आज जरी महिलांना राजकारणात स्थान असले तरी निर्णय घेण्याचे फारसे स्वातंत्र्य नाही. मात्र जयललिता यांनी हा समज खोटा ठरविला. तमाम मंत्रीगण, आमदार, विरोधक त्यांना सतत वचकून असत. आणि गेली तीन दशके त्यांनी पोलादी महिला ही आपली प्रतिमा पक्षात घट्ट रुजवली. याचे महिलांना मोठे कौतुक वाटे. जबरदस्त महत्वाकांक्षा या त्यांच्या गुणाने जयललिता यांना जीवनातील अनेक संकटांवर मात करण्याची ताकद दिली. मोकळ्या वेळेत साहित्याचे वाचन करणाऱ्या जयललिता यांचे हुशारी त्या जेव्हा इंग्रजीत संभाषण करीत तेव्हा नेहमी दिसत असे. याचा अनेकांना मोठा हेवा वाटत असे. साऱ्या दक्षिण भारतात तमिळनाडू वगळता कोणत्याही राज्यांत कधीही महिला मुख्यमंत्री होवू शकलेली नाही. अशा वेळी एकदा दोनदा नव्हे तर तब्बल पाच वेळा मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम जयललिता यांनी करून दाखविला. एकाचवेळी पोलादी महिला आणि गरिबांच्या अम्मा अशा दोन्ही प्रतिमा त्यांनी निर्माण केल्या आणि अंमलबाजवणीही केली.

Web Title: Fearless Lady - Jailalitha