निम्म्या जलस्त्रोतांत अत्यल्प साठा

पीटीआय
मंगळवार, 30 जुलै 2019

मॉन्सूनच्या पावसावरच भारतीय अर्थव्यवस्थेचे गणित अवलंबून असते. यंदा मात्र पावसाळ्याचे दोन महिने सरत आले तरी देशातील 100 प्रमुख जलसाठ्यांपैकी 52 जलसाठ्यांमध्ये 80 टक्के पाणी कमी आहे. केंद्रीय जल आयोगाने ही माहिती दिली आहे. 

नवी दिल्ली -  मॉन्सूनच्या पावसावरच भारतीय अर्थव्यवस्थेचे गणित अवलंबून असते. यंदा मात्र पावसाळ्याचे दोन महिने सरत आले तरी देशातील 100 प्रमुख जलसाठ्यांपैकी 52 जलसाठ्यांमध्ये 80 टक्के पाणी कमी आहे. केंद्रीय जल आयोगाने ही माहिती दिली आहे. 

या माहितीनुसार 25 जुलैपर्यंत गंगा, कृष्णा आणि महानदीच्या खोऱ्यातील नद्या कोरड्याच आहेत. मॉन्सूनने निम्मी वाट गाठली तरी, 100 पैकी 72 जलसाठ्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाणी आहे. यात महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना सर्वांत मोठा फटका बसला आहे. तापी, साबरमतीच्या खोऱ्यांमध्ये पावसाची कमतरता जाणवत असून, कच्छमधील नद्या आणि गोदावरीत अत्यल्प पाणीसाठा आहे. देशातील मॉन्सूनचा कालावधी जून ते सप्टेंबर असा गृहीत धरला जातो. जुलै व ऑगस्ट महिन्यांत सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र, जुलैमध्ये देशातील अनेक भागांत अपुरा पाऊस पडला आहे. 

मराठवाडा, विदर्भात सर्वांत कमी 
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) 36 उपविभागांपैकी 18 विभागांमध्ये कमी पावसाची नोंद झाली, तर 15 केंद्रांमध्ये सरासरीएवढा पाऊस पडला आहे. "आयएमडी'च्या मध्य भारत विभागाअंतर्गत दहा उपविभागांपैकी मराठवाडा, विदर्भ, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ या सात विभागांमध्ये सर्वांत कमी पाऊस नोंदविला आहे. दक्षिण द्वीपकल्प विभागातही अशीच स्थिती आहे. 

गुजरातमध्ये 33.90 टक्के पाऊस 
गुजरातमध्ये आतापर्यंत सरासरीच्या 33.90 टक्के पाऊस पडला आहे, अशी माहिती राज्य आपात्कालीन कार्य केंद्राने सोमवारी प्रसिद्ध केली. बनसकांठा जिल्ह्यातील वाव तालुक्‍यात आज सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासांत 230 मिलिमीटर पाऊस पडला, तर थरड तालुक्‍यात 171 मिमी पावसाची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत 276,59 मिलिमीटर पाऊस पडला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Few reserves in half the water resources in Country Status