विरोधकांच्या विधानांमुळे पाकिस्तानला कोलीत : जेटली

विरोधकांच्या विधानांमुळे पाकिस्तानला कोलीत : जेटली

नवी दिल्ली : दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईनंतर विरोधकांकडून होणाऱ्या प्रश्‍नांमुळे संतप्त झालेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी "ब्लॉग' लिहून "भारतातील विरोधकांना खूप काही शिकण्याची गरज आहे', असा सल्ला दिला आहे. विरोधकांच्या विधानांमुळे पाकिस्तानला कोलित मिळाले असल्याचे फटकारताना जेटली यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनाही लक्ष्य केले आहे.

अर्थमंत्री जेटली यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे, की भारतीय हवाईदलाच्या विमानांनी बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त केल्यानंतर संपूर्ण देश सैन्यदलाच्या बाजूने एकसुरात बोलत असताना विरोधकांच्या परस्परविरोधी विधानांची आवश्‍यकता नव्हती. त्यांच्या या विधानांमुळे भारतीय हितांचे नुकसान झाले. त्यांनी (विरोधकांनी) अशा विधानांमुळे पाकिस्तानला खूष केले. विरोधी पक्षांची नुकतीच झालेली बैठक आणि त्यात संमत झालेल्या ठरावावरही जेटली यांनी हल्ला चढवला. पुलवामा आणि बालाकोटच्या घटनांवरून पंतप्रधान राजकारण करत असल्याचा विरोधकांचा ठराव पूर्णपणे अनुचित होता. यातून शत्रूला नवे हत्यार मिळाले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी 21 पक्षांच्या या संयुक्त निवेदनाचा हुकमाचा पत्ता म्हणून वापर केला, असे त्यांनी म्हटले आहे. 

मर्यादा ओलांडू नका

"पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर आणखी मर्यादा ओलांडली. त्यांनी या हल्ल्याच्या सत्यतेवरच शंका घेत कारवाईचा तपशीलच मागितला. सरकारची आणि आपल्या हवाई दलाची विश्‍वासार्हता संशयातीत आहे. सर्वाधिक निराशाजनक आणि आक्षेपार्ह वक्तव्य माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे होते.

दोन्ही देशांचे स्वतःला उद्‌ध्वस्त करण्याचे प्रयत्न अस्वस्थ करणारे असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या मते दशतवादाचा जनक आणि दहशतवादाचा बळी दोन्हीही सीमेपलीकडे (पाकिस्तान) आहे. डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यांच्या भाषणात भारताच्या सार्वभौमत्वाला दहशतवादातून आव्हान देणाऱ्या शक्तींविरुद्ध स्वसंरक्षणाच्या हक्कावरच शंका घेतली होती. सार्वजनिक संवादामध्ये संयम आणि उदारमतवादाचेही स्थान महत्त्वाचे आहे. विरोधी पक्ष हे समजून घेतील आणि देशाची मान खाली जाणार नाही याची काळजी घेतील,'' अशी अपेक्षा अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com