केजरीवालांच्या श्रीमुखात लगाविणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
रविवार, 5 मे 2019

नवी दिल्लीतील "आप'चे उमेदवार ब्रजेश गोयल यांच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी हा रोड शो आयोजित केला होता. रोड शो मोतीनगर भागातून जात असताना लाल रंगाचा टी-शर्ट घातलेल्या या तरुणाने अचानक गाडीवर चढून केजरीवाल यांच्या श्रीमुखात लगावली. अचानक झालेल्या या हल्ल्याने केजरीवाल कोसळत असताना नेत्यांनी त्यांना सावरले.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर चढून त्यांना श्रीमुखात लगाविणाऱ्या सुरेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केजरीवाल यांची हत्या करण्याचा मोदी-शहा जोडगोळीचा डाव होता, असा गंभीर आरोप 'आप'ने केला असून, भाजपने याआधी केजरीवाल यांनी स्वतःच स्वतःवर हल्ल्याचा बनाव घडवून आणल्याचा ठपका ठेवला. या घटनेमुळे नवी दिल्लीत भाजपला फटका बसेल, असे मानले जाते. नवी दिल्लीतील "आप'चे उमेदवार ब्रजेश गोयल यांच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी हा रोड शो आयोजित केला होता. रोड शो मोतीनगर भागातून जात असताना लाल रंगाचा टी-शर्ट घातलेल्या या तरुणाने अचानक गाडीवर चढून केजरीवाल यांच्या श्रीमुखात लगावली. अचानक झालेल्या या हल्ल्याने केजरीवाल कोसळत असताना नेत्यांनी त्यांना सावरले. त्यानंतर "आप'च्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला पकडून चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या तरुणाचे नाव सुरेश असून, तो कैलास पार्क भागात राहतो. तो केजरीवाल यांच्यावर विविध कारणांमुळे अतिशय नाराज होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर भरदिवसा झालेल्या हल्ल्यानंतर केंद्राच्या हाती असलेल्या दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेची ऐशीतैशी पुन्हा जगासमोर आली व दुसरीकडे यातून राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या घटनेमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा ही जोडगोळीच कारणीभूत असल्याचा थेट आरोप केला. आता मोदी-शहा यांना केजरीवाल यांची हत्या करायची आहे का? असे ट्विट त्यांनी केले. आता हे भ्याड लोक 'आप' तसेच केजरीवालांना अशा पद्धतीने रस्त्यातून हटवू इच्छित असतील, तर केजरीवाल हा तुमचा काळ आहे, हे दोघांनी लक्षात ठेवावे, असाही हल्लाबोल सिसोदिया यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR registered against man who slapped Delhi CM Arvind Kejriwal during Moti Nagar roadshow