चिक्कोडी तालुक्यातील शमनेवाडीत एटीएमला आग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

शमनेवाडी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरला मंगळवारी (ता. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. त्यात 34 लाख जळाल्याचा संशय व्य़क्त होत आहे. तसेच लाखो रुपयांचे साहित्यही खाक झाले आहे.

बेडकिहाळ - शमनेवाडी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरला मंगळवारी (ता. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. त्यात 34 लाख जळाल्याचा संशय व्य़क्त होत आहे. तसेच लाखो रुपयांचे साहित्यही खाक झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (ता. 7) शमनेवाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये तब्बल 36 लाख रुपये जमा करण्यात आले होते. मंगळवारी अक्षयतृतिया असल्याने रक्कम काढण्यासाठी ग्राहकांची वर्दळ होती.

सकाळी 11 च्या दरम्यान एक ग्राहक एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला होता. पण आत काहीतरी जळत असल्याचा वास आला. तो तेथून पैसे काढून निघून गेला. उन्हाचा पारा वाढल्याने एटीएमकडे काही वेळ कोणीच आले नव्हते. त्यानंतर अचानक आतून धूर येत असल्याचे जवळच्या ग्राम पंचायत कार्यालयात बसलेल्या ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांना दिसून आले. 

यावेळी त्वरीत काही ग्राम पंचायत सदस्यांनी कार्यालयातील फायर फायटर घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.  पण आगीने रुद्ररूप धारण केल्याने दोन एअर कुलरचा स्फोट झाला. त्यामुळे काचा फुटून पडल्याने त्या ठिकाणी कोणालाही जाण्याचे धाडस झाले नाही.

त्यानंतर सदलगा येथील अग्नीशामक दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न झाला. पण तोपर्यंत सर्वकाही जळाले होते. 

बँकेच्या एटीएम मशीनमध्ये सोमवारी (ता. 6) 20 लाख रुपये घातले होते. त्याअगोदर एटीएममध्ये 16 लाख रुपये होते. अशी एकूण 36 लाखाची रक्कम एटीएममध्ये होती. अक्षयतृतिया असल्याने त्यातील एक ते दोन लाख रुपये रक्कम ग्राहकांनी काढली असेल. पण एटीएममधील आगीत किती रक्कम जळाली, हे सांगणे कठीण असून याची माहिती बँकेच्या नियमानुसार पुढील तपास केल्यानंतर समजणार आहे.
एटीममधील दोन एअर कुलर, यूपीएस, बॅटरी आदी साहित्याचे सुमारे तीन लाखावर नुकसान झाले आहे. 

- आमोद कुमार, एसबीआयचे शाखा व्यवस्थापक

घटनास्थळी सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल के. व सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेची नोंद सदलगा पोलिसात झाली आहे. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire at ATM in Shamnewadi in Chikodi taluka