दिल्लीत हॉटेलला भीषण आग; 17 मृत्युमुखी

दिल्लीत हॉटेलला भीषण आग; 17 मृत्युमुखी

नवी दिल्ली : दिल्लीतील करोल बाग भागात मंगळवारी पहाटे एका हॉटेलच्या चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 17 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. आग लागल्यानंतर इमारतीतून खाली उडी घेतलेल्या दोन व्यक्तींचाही मृतांमध्ये समावेश आहे. 

करोल बाग भागातील अर्पित पॅलेस हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत 17 जण मृत्युमुखी पडले असून, 35 जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पहाटेच्या वेळी हॉटेलमधील सर्व जण गाढ झोपेत होते, त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. आग लागल्यानंतर अनेक जण इमारतीमध्येच अडकून पडले होते. या हॉटेलमध्ये 45 खोल्या असून, आग लागली त्या वेळी हॉटेलमध्ये 53 जण वास्तव्यास होते, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. या दुर्घटनेनंतर एक जण बेपत्ता असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

अग्निशामक दलाला पहाटे चार वाजून 35 मिनिटांच्या दरम्यान अर्पित हॉलेटच्या इमारतीला आग लागल्याचे वर्दी देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी तातडीने 24 पाण्याचे बंब दाखल झाले होते, अशी माहिती अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. 

"आमची बहीण बेपत्ता' 

हॉटेलमध्ये वास्तव्याला असलेले केरळमधील एक कुटुंब गाझियाबाद येथील एका विवाह समारंभाला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत दाखल झाले होते. या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले, की आम्ही दहा जण हरिद्वारला जाण्यासाठी पहाटे तयार झालो असताना अचानक वीज गेली. त्या वेळी जनरेटर सुरू करण्यात आले आणि नंतर सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले. आम्हा दहा जणांना पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले, त्यामुळे आम्ही बचावलो. मात्र, आमची बहीण अद्याप बेपत्ता आहे. 

मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळाला भेट दिली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 

शॉर्ट सर्किटमुळे लागली आग? 
- या दुर्घटनेत 17 जण मृत्युमुखी, 45 जखमी 
- गुदमरल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता 
- मृत्युमुखी पडलेल्यांत एका लहान मुलाचा समावेश 
- शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज 

- पाच मृतदेहांची ओळख पटविण्यात यश; तीन केरळचे, दोन म्यानमारचे 
- आगीच्या घटनेची न्यायदंडाधिकाऱ्यामार्फेत चौकशी करण्याचे दिल्ली सरकारचे आदेश 

- हॉटेलच्या इमारतीवर रेस्टॉरंट सुरू होते, असा दावा 
- दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग नंतर सर्वत्र पसरल्याची शक्‍यता 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com