'इन्फोसिस'मध्ये तीन दशकातील नीचांकी भरती

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

इन्फोसिसच्या 33 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नियुक्तीचे प्रमाण कमी झाले आहे. दरवर्षी ते सुमारे वीस ते पंचवीस हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात. यावर्षी, त्यांनी केवळ सहा हजार नव्या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आणि सॉफ्टवेअर व्यावसायिकांच्या नियुक्तीचे प्रमाण तब्बल 75 टक्‍क्‍यांनी घसरले आहे. यावर्षी सुमारे 7,000 कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला.
- तेलंगणातील माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव जयेश रंजन

नवी दिल्ली: भारतीय माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अगग्रण्य अशा "इन्फोसिस' कंपनीमध्ये या वर्षी नव्या कर्मचाऱ्यांच्या भरतीचे प्रमाण 33 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोचल्याची माहिती तेलंगणमधील एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.

तेलंगणातील माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव जयेश रंजन यांनी "इंडियासॉफ्ट-2017' परिषदेत बोलताना इन्फोसीसमधील कर्मचारी भरतीबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्याशी अलिकडेच झालेल्या संवादाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, "नारायण मूर्ती यांनी मला काही दिवसांपुर्वी सांगितले की, इन्फोसिसच्या 33 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नियुक्तीचे प्रमाण कमी झाले आहे. दरवर्षी ते सुमारे वीस ते पंचवीस हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात. यावर्षी, त्यांनी केवळ सहा हजार नव्या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आणि सॉफ्टवेअर व्यावसायिकांच्या नियुक्तीचे प्रमाण तब्बल 75 टक्‍क्‍यांनी घसरले आहे. यावर्षी सुमारे 7,000 कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला.' यावेळी बोलताना रंजन यांनी ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमता यासारख्या विविध तंत्रज्ञानाचा माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांबाबत माहिती दिली.

"इन्फोसिस'चे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी तिसऱ्या तिमाही निकालांच्या घोषणेच्या वेळी सांगितले होते की कंपनीने चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांमध्ये 5,700 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. मागील आर्थिक वर्षात याच काळात हा आकडा 17,000 एवढा होता. कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संख्येत आम्हाला अशीच वाढ अपेक्षित आहे. परंतु या प्रक्रियेचा वेग मंदावण्याची शक्‍यता आहे, असे सिक्का यांनी सांगितले होते.

Web Title: For the first time in 33 years, Infosys logs drop in employee hiring