मासे सुरक्षित हे जनतेला पटवून द्या : इब्राहिम 

Ibrahim Maulana
Ibrahim Maulana

पणजी : मासे हे खाण्यास सुरक्षित आहे हे गोव्यातील जनतेला पटवून देण्यासाठी सरकारी पातळीवर कोणतेही प्रयत्न होत नाहीत. मासे विक्रेत्यांच्या समस्या ऐकण्यासही सरकारला वेळ नाही याचमुऴे मासे खाण्यास किती सुरक्षित हा प्रश्न सुटला नाही, असे निरीक्षण घाऊक मासळी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम मौलाना यांनी व्यक्त केले. गोव्यात सध्या मासळी टिकवण्यासाठी फॉर्मेलीन या मानवी मृतदेह टिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनाचा वापर होतो अशी भीती जनतेत आहे. घाऊक मासळी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम मौलाना यांच्याकडे सगळेजण संशयाने पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी झालेल्या प्रश्नोत्तराचा संपादीत भाग असा

प्रश्न - सरकार तु्म्हाला व्यापार परवाना घेण्यास सांगते तो घेण्यास अडचण ती कोणती?
इब्राहिम-
  आम्हाला आता व्यापार परवाना घेण्यास सांगितले आहे. मुळात आमचा व्यवसाय कसा चालतो हे समजून न घेता हा निर्णय आमच्यावर लादला गेला आहे. मडगावला घाऊक मासळी बाजार आहे म्हणजे तेथे दुकाने आहेत तेथे मासळी आणली जाते आणि ती विक्रेत्यांना विकली जाते असा समज कोणाचाही असू शकतो. प्रत्यक्षात तसे काही नाही. मासळी बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आमच्या संघटनेचे कार्यालय तेवढे आहे. तेथे माशांच्या गाड्या येऊन उभ्या राहतात. तेथे विक्रेत्यांसोबत दर ठरतो आणि मासे त्यांच्या वाहनातून नेले जातात. वाहन उभे करण्यासाठी आम्ही सोपो कर देतो. तो वाहनामागे अमूक रुपये या पद्धतीने आकारला जातो.

प्रश्न- मग व्यापार परवाना घेण्यात अडचण ती कोणती?
इब्राहिम-
शॉप अॅण्ड एस्टाब्लीशमेंट कायद्याखाली नोंदणी करण्यासाठी आधी दुकान हवे. ते आमच्याकडे नाही. आमचा व्यवहार हा पहाटे चार ते सकाळी ९ यावेळेत उघड्यावर चालतो. त्या जागेच्या वापराचाही कर आम्ही देतो. आता आम्ही मडगाव पालिकेकडे आम्हाला व्यापार परवान्यासाठी ना हरकत दाखला द्यावा अशी मागणी अाम्ही केली आहे. आता १५ नोव्हेंबरला पालिकेची बैठक आहे. त्यात आम्हाला दाखला द्यायचा की हे ठरेल. या दाखल्याअभावी आम्हाला परवाना मिळू शकत नाही. अन्न व औषध प्रशासन खात्याला आताच नोंदणी का आठवली हे अनाकलीय आहे.

प्रश्न- तुम्ही आताच कुठून टपकला असे सरकारचे म्हणणे आहे. तु्म्ही आला तरी कुठून?
इब्राहिम-
मी गेली चाळीस वर्षे या व्यवसायात आणि मडगावातच आहे. १५ वर्षे वास्तव केल्यानंतर सरकारी नोकरीसाठीही एखाद्याला गोमंतकीय समजण्यात येत असेल तर मी कुठून आलो ही विचारणा हेतूतः  करण्यात येत आहे असे मला वाटते. गोवा मुक्तीपूर्व काळापासून माझे वडील मडगावातच हा व्यवसाय करत होते. माझा जन्म जरी कर्नाटकात झाला असला तरी मी माझ्या वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी गोव्यात आलो यात माझी काय चूक. कोण कुठला अशी हेटाळणी करणे चुकीचे आहे.
प्रश्न- आणण्यात येणाऱ्या माशांवर फॉर्मेलीन शिंपडले जाते, त्यामुळे ते खाण्यास अयोग्य आहेत असा जनतेचा सार्वत्रिक समज आहे, त्याबाबत काय म्हणणे आ्हे?
इब्राहिम- विश्वास ठेवा अगर ठेऊ नका पण मी हा शब्द १२ जुलैलाच पहिल्यांदा ऐकला. नाही म्हणायला केरळ सरकारने १५ जून ते ३० जून या कालावधीत केरळमधून बाहेर जाणाऱ्या सुंगुटांची तपासणी सिमेवर सुरु केली होती. ती सुंगटे इशान्येकड़ील राज्यात जातात. त्यावेळी मासे टिकवण्यासाठी रसायनांचा वापर होत असल्याची चर्चा होती. मात्र परवानगी असलेल्या रसायनांच्या वापराची ती चर्चा होती. त्या चर्चेत फॉर्मेलीन हा शब्द नव्हता. हा शब्द १२ जुलैलाच पहाटे अचानकपणे अन्न व औषध प्रशासन खात्याने केलेल्या तपासणीनंतर ऐकावयास मिळाला.

प्रश्न- पण मासे खाण्यास सुरक्षित आहेत का?
इब्राहिम-
सरकारने सिमेवर तपासणी केली. अधूनमधून बाजारातील नमूनेही तपासले त्यात काही वावगे सापडले नाही. त्यामुळे मासे खाण्यास सुरक्षित हा निष्कर्ष काढता येतो. मुळात गोव्यात येणारे मासे हे उडूपी आणि रत्नागिरीकडून येतात. ते १० तासात पोचतात. ते केवळ बर्फ टाकून आणले जातात. सायंकाळी आम्ही व्यापारी स्थानिक पातऴीवर किती मासे व कोणते मासे उपलब्ध होतील याचा अंदाज घेतो आणि मासे पुरवठादारांना दूरध्वनीवर कोणते मासे किती पाठवावे याची कल्पना देतो त्यानंतर तेथून मासेवाहू गाड्या गोव्याकडे येण्यास निघतात. दररोज हे चालते. त्यामुळे मासे टिकवण्यासाठी बर्फाव्यतिरीक्त अन्य कशाचाही उपयोग करावा लागत नाही.

प्रश्न- मग आंध्रप्रदेश तमीळनाडूतून मासे अाणण्यात येतात असे जे सांगितले जाते ते खोटे आहे?
इब्राहिम-
देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाळ्यात मासेमारी बंदी असते. पूर्व किनाऱ्यावर १५ एप्रिल ते १५ जून अशी मासेमारी बंदी असते. आमच्याकडे मासेमारी बंदी असते त्याकाळात आंध्रप्रदेश व तमीळनाडूतून मासे आणण्यात येतात. त्या प्रवासासाठी ३८ तास लागतात. मात्र या प्रवासासाठी हवाबंद वाहने वापरली जातात. बर्फात मासे ठेवले की बर्फ वाहन उघडेपर्यंत वितळत नाही. पावसाळ्यात ही मासळी आणण्यात येत होती. फॉर्मेलीनचा विषय़ चर्चेत आल्यावर मी तेथील पुरवठादारांना याविषयी विचारणा केली. त्यांनी स्पष्टपणे याचा इन्कार केला आहे. तेथील मासळी युरोप आणि थायलंडमध्येही जाते. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय मानकांची कल्पना आहे.

प्रश्न- आणखीन एक आरोप होतो तो म्हणजे पैशाच्या मोठ्या व्यवहाराचा. यात बेहिशोबी असा पैसा निर्माण होतो का?
इब्राहिम-
सारा व्यवहार रोखीने व विश्वासावर होतो ही गोष्ट खरी आहे. मात्र आम्ही प्राप्तीकर (इन्कमटॅक्स) भरतो. राज्यात सर्वाधिक प्राप्तीकर भरणाऱ्यांत माझा समावेश होतो. आम्ही पुरवठदारांना मासे पुरवण्यास दूरध्वनीवर सांगतो. ते विश्वासाने मासे पाठवतात. आमच्याकडून विक्रेते मासे घेतात आणि दोन तीन दिवसात ते पैसे देतात. आम्हाला ५ ते १० टक्के रक्कम एकंदर व्यवहारावर मिळते. कधी कधी तीही मिळत नाही. यात धोका मोठा असतो. बाजारातील माशांचा दर आमच्याकडून मासे घेणारे विक्रेते ठरवतात. त्यामुळे कधी पैसे मिळाले तर कधी नाही असे होत असते. यात बेहिशोबी पैसे निर्मितीच्या फार कमी संधी आहे. मासे काही आम्ही उत्पादीत करत नाही त्यामुळे पुरवठादाराला ते पैसे द्यावे लागतात. हा व्यवहार रोखीने करावा लागत असल्याने आम्हालाही मोठी गुंतवणूक करावी लागते. त्या तुलनेत मिळणारे पैसे हे अन्य कोणत्याही व्यवसायात मिऴतील एवढेच पैसे याही व्यवसायात मिळतात.

प्रश्न- जनतेचा विश्वास कमावण्यासाठी पुन्हा काय करावे लागेल?
इब्राहिम-
मासे विकत घेतल्यावर संशय़ आल्यास ते तपासून निर्धोक आहेत हे सांगणारी यंत्रणा सरकारने उभारावी. आम्ही सरकारने सांगितलेले नियम अटी पाळण्यास तयार आहोत फक्त आमचे काही प्रश्न आहेत ते सरकारने ऐकावेत असे आमचे म्हणणे आहे. देशभर जर मासे खाण्यास कोणाला हरकत नाही तर मग गोव्यातच ती का याचाही विचार सरकारने केला पाहिजे. जनतेचा विश्वास कमावण्याच्या नादात घाऊक मासऴी विक्रेत्यांवर अन्याय होऊ नये असे आमचे म्हणणे आहे.

प्रश्न- तुम्ही संख्येने शंभरच तर आहात ना?
इब्राहिम-
खरे सांगू, आमची संघटना स्थापन, नोंदणीकृत झाली तेव्हा सदस्यसंख्या शंभर होती. त्यामुळे आम्ही शंभरेकजण आहोत असा समज आहे. प्रत्यक्षात आता सुमारे ८० जणच या व्यवसायात राहिले आहेत. अत्यंत बेभरवशाचा असा हा व्यवसाय आहे. त्यात सरकारही आमच्या समस्या ऐकण्यास तयार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com