गोव्यात इतर राज्यातील मासळीची आयात बंद

गोव्यात इतर राज्यातील मासळीची आयात बंद

मडगाव :  अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सुरु असलेल्या कारवाईमुळे इतर राज्यांतून होणारी मासळीची आयात तीन दिवस बंद ठेवण्यात आल्याने गोव्यात मासळीची टंचाई निर्माण झाली असून मासळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका मासेप्रेमींसह हॉटेल व्यवसायिकांना बसला आहे. मार्केटमध्ये एफडीएने मासळी तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्याची ठोस पावले न उचलल्यास 1 नोव्हेंबरपासून इतर राज्यांतील मासळीची आयात बंद ठेवण्याचे मडगाव घाऊक मार्केट संघटनेने जाहीर केल्याने पुढील काही दिवस मासळी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात आजही केवळ 10 टन आवक झाली. एफडीएच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी महाराष्ट्र व कर्नाटकातून होणारी मासळीची आयात गेले तीन दिवस केली आहे. केवळ स्थानिक मच्छीमारांकडून पुरवण्यात येणारी मासळी मार्केटमध्ये येत आहे. आज तारली व बांगडे मासळी तेवढी मार्केटात उपलब्ध होता. अल्प प्रमाणात उपलब्ध झाल्याने मासळीचे दर आज भरमसाठ वाढले. तारलीचा दर आज 80 तर बांगड्यांचा दर 180 ते 200 रुपये किलो असा होता, अशी माहिती मासळीचे एजंट कांता नाईक यांनी दिली.

किरकोळ बाजारात बांगड्याचा आजचा दर 100 रुपयांना चार असा होता, अशी माहिती पणजी मासळी मार्केट विक्रेता संघटनेच्या अध्यक्ष इझाबेला डिकॉस्ता यांनी दिली. स्थानिक मच्छीमारांकडून पुरवण्यात येणारी मासळी फारच अपुरी पडत असल्याचे येथील एसजीपीडीए किरकोळ मार्केट मासळी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष फेलीक्स गोन्सालवीस यांनी सांगितले. इतर राज्यांतील मासळीची आयात सुरु न झाल्यास मासळी व्यवसायिकांसह, हॉटेल व्यावसायिकांचेही नुकसान होणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com