गोव्यातील मासळी व्यावसायिकांचा आंदोलनाचा इशारा

गोव्यातील मासळी व्यावसायिकांचा आंदोलनाचा इशारा

मडगाव : फॉर्मेलीन प्रकरणानंतर सुरु झालेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईमुळे त्रस्त झालेल्या मासळी व्यावसायिकांनी या प्रश्नावर सरकारने चर्चेद्वारे तोडगा काढण्याची मागणी केली असून या विषयावर तोडगा न निघाल्यास 3 नोव्हेंबरला पणजी येथील आझाद मैदानावर संपूर्ण गोव्यातील मासळी व्यावसायिक आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. 

मडगाव रविंद्र भवनात आज सकाळी मासळी व्यावसायिकांची बैठक झाली. या बैठकीत संपूर्ण गोव्यातील सुमारे 700 मासळी व्यावसायिक उपस्थित होते. फॉर्मेलीन बंद करा व मासळी सुरु करा असा ठराव या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मडगाव घाऊक मासळी मार्केट विक्रेता संघटनेचे अध्यक्ष इब्राहीम मुसा यांनी दिली. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष कांता नाईक, मडगाव किरकोळ मासळी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष फेलीक्स गोन्सालवीस, पणजी मासळी विक्रेता संघटनेच्या अध्यक्ष इझाबेल डिकॉस्ता, शशिकला गोवेकर, ज्योकीम बोर्जीस उपस्थित होते.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व मुख्य सचिव धर्मेश सिंग यांना संघटनेने निवेदन दिले आहे. त्यांच्याकडून चर्चेसाठी कधी बोलावणे येते या प्रतीक्षेत संघटना आहे, असे मुसा यांनी सांगितले.

आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षीत मासळी मिळावी यासाठी एफडीएने संबंधीत व्यावसायिकांवर काही निर्बंध लादले आहेत. एफडीएकडे नोंदणी न केलेली व इन्सुलेटेड नसलेली इतर राज्यांतील मासळीची वाहने गोव्याच्या सीमेवर अडवून माघारी पाठवण्यात येत आहे. पालिकेचा व्यापार परवाना नसलेल्या मासळी विक्रेत्यांचे नोंदणी प्रमाणपत्र एफडीएने रद्द करून मासळीची विक्री व वितरण न करण्याची सूचना केली आहे. यामुळे इतर राज्यांतील मासळीची आयात बंद झाल्याने गोव्यातील मासळी व्यवसाय ठप्प झाला आहे.

मडगाव पालिकेने व्यापार परवाना अध्याप दिलेला नाही. मार्केटची मालकी असलेल्या दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरण (एसजीपीडीए) मासळी विक्रेत्यांना मान्यता देण्यास टाळाटाळ करत आहे. व्यापार परवाना मिळत नसल्याने एफडीए मासळी व्यावसायिकास नोंदणी प्रमाणपत्र देत नाही. त्यामुळे मासळी विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मिळत नाही. इन्सुलेटेडे वाहनाची अटही न्याय्य नाही. हे त्रांगडे सोडवण्यासाठी सरकारने मासळी व्यावसायिकांना एकदा चर्चेस बोलवावे अशी मागणी मुसा यांनी केली. फॉर्मेलीन प्रकरणी जनतेची भिती दूर करून त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी गोव्यातील प्रत्येक मासळी मार्केटात एफडीएने त्वरित चाचणी यंत्रणा उभारावी अशी मागणीही त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com