भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच करार

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच करार

मेलबॉर्न : गुंतवणूक आणि परस्पर सहकार्याला चालना देणारे पाच करार आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, त्यांनी सिडनीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट घेतली. शिक्षण, कृषी संशोधन, दिव्यांग क्षेत्रात सहकार्य आणि गुंतवणूक वाढण्यासंदर्भात पाच करारांवर सह्या करण्यात आल्या. यादरम्यान राष्ट्रपतींना मानवंदना देण्यात आली. 

कोविंद यांचे बुधवारी सिडनीत आगमन झाले. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी या करारासंदर्भातील माहिती दिली. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री मॅरिस पायने आणि भारताचे कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे आणि दोन्ही देशांचे राजदूत यांच्या उपस्थितीत करार करण्यात आले. कोविंद आणि मॉरिसन यांची बैठक झाल्यानंतर मॉरिसन यांनी भारतासमवेतच्या आर्थिक सहकार्याची रणनीती जाहीर केली. ऑस्ट्रेलिया भारतात कोणकोणत्या क्षेत्रात आणि भागात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे, याचा आरखडा या वेळी सादर करण्यात आला. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत ऑस्ट्रेलियातील उद्योजकांना गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध होत आहे. 

ऑस्ट्रेड आणि इन्व्हेस्ट इंडिया करारानुसार उभय देश खाद्यक्षेत्रात परस्परांना सहकार्य करतील. या माध्यमातून कृषी-तंत्रज्ञान आणि सेवाक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया आणि भारत सामरिक संशोधन निधी हे 5 लाख ऑस्ट्रेलियन डॉलरची मदत करणार आहेत. दोन्ही देश आर्थिक देवाण-घेवाणीसंदर्भात व्यापक सहकार्य करणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचे उद्योगमंत्री सिमॉन बर्मिघम म्हणाले. भारतात आपला उद्योग विस्तारण्यासाठी मदत करणार असून, येत्या वर्षभरात करण्यात येणाऱ्या प्रमुख कामांचीही त्यांनी माहिती दिली. 

गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सिडनी शहरातील परमट्टा येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या वेळी त्यांच्या पत्नी सविता कोविंद आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन उपस्थित होते. या वेळी उपस्थित भारतीय समुदायातील नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.

दरम्यान, राष्ट्रपती शुक्रवारी मेलबर्नचा दौरा करणार असून, तेथे व्हिक्‍टोरिया प्रांताच्या गव्हर्नर लिंडा देसाऊ यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर मेलबर्न विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीदेखील ते संवाद साधणार आहेत. ऑस्ट्रेलियात 70 हजार भारतीय विद्यार्थी असून, या दौऱ्यादरम्यान ते भारतीय वंशाच्या नागरिकांनादेखील मार्गदर्शन करणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com