रोख हवे तर एक हजारामागे पन्नास रुपये द्या!

अभिजित हिरप
बुधवार, 17 मे 2017

नोटबंदीला सहा महिने उलटून गेले. मात्र, त्याचा परिणाम अद्यापही कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागात सहकारी बॅंकांच्या तिजोऱ्या रिकाम्या असल्याने पैशांची चणचण मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. बॅंक अथवा एटीएममधून पैसे काढण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू आहे.

औरंगाबाद - नोटबंदीला सहा महिने उलटून गेले. मात्र, त्याचा परिणाम अद्यापही कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागात सहकारी बॅंकांच्या तिजोऱ्या रिकाम्या असल्याने पैशांची चणचण मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. बॅंक अथवा एटीएममधून पैसे काढण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू आहे. त्यामुळे पैसे काढून देणारे दलाल ग्रामीण भागात सक्रिय झाले आहेत. एटीएम अथवा चेकद्वारे पैसे काढून देण्यासाठी हे दलाल हजारामागे पन्नास रुपये कमिशन घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटबंदीच्या दरम्यान रिझर्व्ह बॅंकेकडून शहरातील करन्सी चेस्टमध्ये काही प्रमाणात का होईना दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचा पुरवठा व्हायचा. त्यामुळे करन्सी चेस्ट बॅंकांकडून खासगी, सहकारी आणि पतपेढ्यांकडे थोडेबहुत पैसे पाठविले जायचे. 12 मार्चपर्यंत एटीएम अथवा थेट बॅंकेतून पैसे काढण्यासाठी मर्यादा आणण्यात आली होती. मात्र, ही मर्यादा संपुष्टात आल्यानंतर लोकांनी बॅंकातून पैसे मोठ्या प्रमाणात काढण्यास सुरवात केली. दुसरीकडे मर्यादा उठविल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेकडून पुरेशा प्रमाणात औरंगाबादमधील बॅंकांना रक्‍कम पाठविण्यात आली नाही.

त्याचा परिणाम प्रत्येक महिन्याच्या एक ते पंधरा तारखेदरम्यान जाणवू लागला. यादरम्यान सेवानिवृत्तीवेतन, मासिक पगार व अन्य कामांसाठी मोठ्या प्रमाणात रोख रकमेची आवश्‍यकता भासते. ही आर्थिक नड येनकेनप्रकारे सोडविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये दलाल सक्रिय झाले. हे दलाल ज्यांचे पैसे काढावयाचे अशा किमान दहा खातेधारकांचे एटीएम घेऊन तालुका अथवा शहराचा रस्ता धरतात. पैसे असलेल्या एटीएमची शोधाशोध करून हे दलाल एकाचवेळी एक ते दोन लाख रुपयांपर्यंतची रक्‍कम एकाचवेळी काढतात. त्यामुळे पैसे काढून देणाऱ्या दलालांचा धंदा चांगलाच बोकाळला आहे. काहीवेळा एटीएम नसल्यास चेकद्वारेसुद्धा हे व्यवहार पूर्ण होत आहेत. या कामासाठी प्रवास व जेवणाचा खर्च वगळून किमान पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत कमाई होते. मात्र, उन्हातान्हात फिरून पैसे काढण्याऐवजी 50 रुपये खर्चून पैसे हाती येत असल्याने खातेधारकांनाही हे सोयीचे वाटत आहे, हे विशेष.

एक व्यक्‍ती, अनेक एटीएम
सध्या औरंगाबादमधील सातशेपैकी सहाशेहून अधिक एटीएम पैसे नसल्याने बंद आहेत. त्यामुळे कुटुंब, नातेवाईक अथवा मित्रांपैकी ज्याला वेळ असतो, त्याच्याकडे
एटीएम कार्ड दिले जाते. मग ती व्यक्‍ती दिवसभर सुरू असलेल्या एटीएमवर नजर ठेवतो. एटीएमवर पैसे आले की, लगेचच एटीएममधून पैसे काढतो. मात्र, आपला नंबर येईपर्यंत पैसे राहतील की नाही, याची धाकधूक रांगेतील एटीएमधारकाला असते. हा आर्थिक तुटवडा कधीपर्यंत राहील, याबाबत काहीही सांगता येणार नसल्याची माहिती भारतीय स्टेट बॅंकेच्या अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Five percentage for thousand rupess cash in Aurangabad