फ्लिपकार्टचे सचिन बंसल करणार पिरामलमध्ये 200 कोटींची गुंतवणूक!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 जुलै 2019

वॉलमार्टने संपादित केलेल्या फ्लिपकार्टमधील आपला 5.5 टक्के हिस्सा विकून मागील वर्षी बंसल यांनी 1 अब्ज डॉलरची कमाई केली होती. अलीकडच्या काळात सचिन बंसल गुंतवणूकीच्या क्षेत्रात अनेक मोठी पावले उचलताना दिसत आहेत.

मुंबई : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांनी पिरामल एंटरप्राईझेसच्या नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्समध्ये (एनसीडी) 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मागील पाच महिन्यात बंसल यांची एनबीएफसीमधील ही दुसरी गुंतवणूक आहे.

याआधी अलटीको कॅपिटल इंडिया लि. आणि इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लि. या दोन नॉन बॅंकिंग फायनान्शियल कंपन्यामध्ये (एनबीएफसी) 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. वॉलमार्टने संपादित केलेल्या फ्लिपकार्टमधील आपला 5.5 टक्के हिस्सा विकून मागील वर्षी बंसल यांनी 1 अब्ज डॉलरची कमाई केली होती. अलीकडच्या काळात सचिन बंसल गुंतवणूकीच्या क्षेत्रात अनेक मोठी पावले उचलताना दिसत आहेत. आपला हिस्सा विकून मिळालेली बहुतांश रक्कम बंसल फायनान्शियल सर्व्हिसेस व्यवसायात गुंतवणार असल्याचे समोर आले आहे.

पिरामलच्या एनसीडीमधील गुंतवणूकीसाठी बंसल यांना 9.5 टक्के व्याजदर मिळणार असून या एनसीडीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. अलीकडेच अब्जाधीस अजय पिरामल यांच्या नेतृत्वाखालील पिरामल एंटरप्राईझेसने संचालक मंडळाच्या प्रशासकीय समितीने 15,000 एनसीडींना परवानगी दिल्याची माहिती दिली आहे. या प्रत्येक एनसीडीचे दर्शनी मूल्य 10 लाख रुपये आहे. पिरामल एंटरप्राईझेस औषधनिर्माण, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि हेल्थकेअर क्षेत्रात कार्यरत असून कंपनीचा 46 टक्के महसूल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून येतो. सप्टेंबर 2018 आणि मार्च 2019 दरम्यान कंपनीने 16,500 कोटी रुपयांचे भांडवल एनसीडी आणि बँकाकडील कर्जाच्या माध्यमातून उभारले आहे. मार्च 2019 अखेर चौथ्या तिमाहीत पिरामल एंटरप्राईझेसच्या नफ्यात 88 टक्क्यांची घट होत कंपनीला 456.24 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

सचिन बंसल यांनी आतापर्यंत 900 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपन्यांचे कर्जरोखे आणि एनबीएफसीमध्ये केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flipkarts Sachin Bansal invested 200 crores in Piramal