भरकटलेल्या युवकांच्या समुपदेशनावर भर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्या सात महिन्यांमध्ये सत्तरहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर सुरक्षा दलांनी नव्यानेच दहशतवादाकडे वळलेल्या युवकांना पकडण्यावर विशेष भर देण्याचे ठरविले आहे. अशा भरकटलेल्या युवकांना पकडून, त्यांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबाकडे पाठविण्यावर लष्कर लक्ष केंद्रित करणार आहे. 
 

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्या सात महिन्यांमध्ये सत्तरहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर सुरक्षा दलांनी नव्यानेच दहशतवादाकडे वळलेल्या युवकांना पकडण्यावर विशेष भर देण्याचे ठरविले आहे. अशा भरकटलेल्या युवकांना पकडून, त्यांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबाकडे पाठविण्यावर लष्कर लक्ष केंद्रित करणार आहे. 

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवकांना जिहादसाठी चिथावणी देण्यास आणि त्यांना कट्टरतावादी बनविण्यात सक्रिय असलेले एक जाळेच नष्ट करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. या "कॅच देम अलाइव्ह' या धोरणाअंतर्गत दहशतवादाकडे वळालेल्या अथवा त्या मानसिकतेत असलेल्या युवकांना पकडून त्यांच्या अडचणी आणि नाराजी समजून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. कोणत्याही पंधरा-सोळा वर्षांच्या मुलाला आत्मघाती बनण्यास पूर्णपणे प्रवृत्त करता येत नाही, त्यामुळे प्रयत्न करून त्यांना वेळीच मार्गावर आणले पाहिजे, असे सुरक्षा दलांनी ठरविले आहे. रमाजानच्या महिन्यात शोध मोहिमा आणि छापे घातले जाणार नसल्याने हे धोरण राबविण्यासाठी लष्कराला अधिक वेळ मिळणार आहे. 

गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादाकडे वळालेल्या अनेक युवकांना मूळ प्रवाहात पुन्हा येण्याची इच्छा आहे. अनेक युवकांचे पालकही मदतीसाठी पोलिसांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना भेटत असतात. त्यांना तातडीने मदतही केली जाते. सध्याच्या शांततेच्या काळाचा फायदा उठवत भरकटलेल्या युवकांच्या पालकांच्या भेटीगाठी घेण्याचा सुरक्षा दलांचा प्रयत्न असेल. या प्रयत्नांतून सकारात्मक वातावरण तयार होऊन युवक हिंसेच्या मार्गापासून दूर जातील, असा विश्‍वास सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

ट्रेंड बदलला 

दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधून त्यांना तातडीने ठार मारणे, त्यांना मदत करणाऱ्यांचे जाळे नष्ट करणे, या आणि अशा अनेक लष्करी मोहिमांमुळे दहशतवादी आता मोकळेपणाने फिरताना दिसत नाहीत. यापूर्वी ते त्राल, शोपियॉं, कुलगाम अशा भागांत घोळक्‍याने फिरत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून नेहमीच प्रसिद्ध होत होते. मात्र, या व्हिडिओचा फायदा उठवत लष्कर त्यांचा ठावठिकाणा शोधून काढत असे आणि कारवाई करत असे. त्यामुळे आता असे व्हिडिओ बंद झाले आहेत. 

Web Title: focus on lost youth in jammu and kashmir