केरळमध्ये पुनर्वसनावर लक्ष केंद्रित ; मदत निधीत 539 कोटी जमा 

पीटीआय
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये पुराचे पाणी कमी झाल्यानंतर आता मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतलेल्या 10.40 लाखांपेक्षा अधिक लोकांच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पुरामुळे हे लोक बेघर झाले आहेत. दरम्यान, देश-विदेशांतील लोकांनी मुख्यमंत्री आपत्ती मदत निधीमध्ये साहित्य आणि रोख रक्कम देऊन राज्याची मदत केली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (गुरुवारी) रात्रीपर्यंत एकूण 539 कोटी रुपये जमा झाले आहेत. 

छावण्यांमध्ये राहात असलेल्या लोकांनी घरी परतण्यास सुरवात केली आहे. पुराचे पाणी कमी झाल्यानंतर गेल्या पाच दिवसांत सुमारे पाच लाख लोक आपल्या घरी परत गेले आहेत. मात्र, घरी परतल्यानंतर या लोकांसमोर घराच्या साफसफाईचे मोठे आव्हान असणार आहे. कारण ही घरे विषारी सापांसह विविध प्रजातीच्या किड्यांनी, तसेच कचऱ्याने भरून गेली आहेत. 

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पुराचा अधिक फटका बसलेल्या अलाप्पुझा, एर्नाकुलम, पत्तनमतिट्टा आणि त्रिशूर या जिल्ह्यांत काल विविध मदत छावण्यांचा दौरा केला. त्यांनी सांगितले, की सरकारचे लक्ष आता लोकांचे पुनर्वसन आणि राज्याला पुन्हा उभे करण्यावर आहे. स्वच्छता प्रक्रियेवर ते म्हणाले, की स्वच्छता मोहीम सुरू आहे आणि 37 हजार विहिरी, तसेच 60 हजार घरांची सफाई करण्यात आली आहे. आरोग्याला अपाय होण्याच्या धोक्‍यामुळे सुरक्षा दलांना मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यास सांगितले आहे. पूरग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांशी विचारविनिमय केल्यानंतर त्यांना योग्य ठिकाणी स्थलांतरित केले जाईल. 

मदतीद्वारे साजरा करू या ओणम... 

दरम्यान, ओणमचा सण उद्या (शनिवारी) साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री पी. विजयन यांनी पूरग्रस्त लोकांना आश्रय, तसेच मदत देऊन ओणमचा सण साजरा करू या, असे आवाहन केले. पुरामुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी बॅंकांकडून व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्याच्या योजनेवरही विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. केरळमध्ये मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात आठ ऑगस्टपासून आतापर्यंत जोरदार पाऊस आणि पुरामुळे 231 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

केरळमधील चित्र..

2770 : राज्यभरातील छावण्या 
10.40 लाख : छावण्यांतील लोक 
20 हजार कोटी : नुकसानीचा अंदाज 
3500 : मच्छीमार मदतकार्यात सामील 
65 हजार : लोकांना मच्छीमारांनी वाचविले 
2.5 कोटी : मच्छीमारांच्या नौकांसाठी पॅकेज 

Web Title: Focus on rehabilitation in Kerala 539 crore deposits in aid fund