जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्यास मिळणार घटस्फोट : उच्च न्यायालय

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जून 2018

जबरदस्तीने प्रस्थापित केलेले शरीरसंबंध किंवा अनैसर्गिक संबंधांसाठी पती किंवा पत्नीवर दबाव आणला जातो. त्यामुळे पती आणि पत्नीमधील नाते संपुष्टात येऊ शकते. त्याच आधारे संबंधित पती किंवा पत्नीला घटस्फोट मिळू शकतो, असे न्यायालयाने नमूद केले.

चंदीगड : जबरदस्तीने शरीरसंबंध किंवा अनैतिक संबंध ठेवल्यास संबंधित पती किंवा पत्नीला त्यावरून घटस्फोट मिळू शकतो, असे मत पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाने व्यक्त केले. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्या याचिकेवर चार वर्षानंतर सुनावणी घेण्यात आली असून, त्याबाबत न्यायालयाने हा निकाल दिला. 

येथील एका उच्चशिक्षित तरुणीचा विवाह 2017 मध्ये बिहारच्या एका तरुणाशी झाला होता. या दोघांना एक मुलगाही आहे. विवाहादरम्यान माहेरच्या मंडळींनी पतीच्या घरच्यांना हुंडाही दिला होता. तसेच लग्न ठरताना नवरा मुलगा इंजिनिअर असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडून त्या तरुणीला लग्नानंतर मारहाण करण्यात येत होती. याशिवाय पतीकडून अनैसर्गिक संबंध ठेवण्यात येत होते, असे आरोप त्या तरुणीने केले होते. 

त्यावर हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत, असे न्यायालयाने याचिकेवरील सुनावणीदरम्यान सांगितले. तसेच जबरदस्तीने प्रस्थापित केलेले शरीरसंबंध किंवा अनैसर्गिक संबंधांसाठी पती किंवा पत्नीवर दबाव आणला जातो. त्यामुळे पती आणि पत्नीमधील नाते संपुष्टात येऊ शकते. त्याच आधारे संबंधित पती किंवा पत्नीला घटस्फोट मिळू शकतो, असे न्यायालयाने नमूद केले.

दरम्यान, या तरूणीने घटस्फोट मिळावा, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. मात्र, यापूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास कनिष्ठ न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर आता चार वर्षांनी उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.

Web Title: Forcible Sex Is Ground For Divorce Punjab And Haryana High Court