गोव्यात परराज्यातील माशांवर बंदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

सध्या गोव्यात खोल समुद्रातील मासेमारीवर १ जून ते ३१ जुलै अशी बंदी आहे, त्यामुळे आंध्रप्रदेश आणि केरळमधील मासे आणून ते विक्रेते विकतात.

पणजी - गोवा सरकारने आज मध्यरात्रीपासून १५ दिवस परराज्यातून मासे आणून ते गोव्यात विकण्यास बंदी घातली आहे. मुख्ममंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज मंत्रालयातच तातडीने घेतलेल्या पत्रकार परीषदेत या बंदीची घोषणा केली. सध्या गोव्यात खोल समुद्रातील मासेमारीवर १ जून ते ३१ जुलै अशी बंदी आहे, त्यामुळे आंध्रप्रदेश आणि केरळमधील मासे आणून ते विक्रेते विकतात.

मडगाव येथील मासळी बाजारातील मासे अन्न व औषध प्रशासन खात्याने तपासले असता त्या माशांत फॉर्मेलीन या रसायनाचा अंश सापडला होता. त्यानंतर हा वाद सुरु झाला आहे. सरकारचे म्हणणे आहे की फॉर्मेलीन हे नैसर्गिकरीत्या माशांत असते आणि त्याची कमी मात्रा हानीकारक नसते. मात्र तज्ज्ञांनी फॉर्मेलीन हे नैसर्गिकरीत्या माशांत असते हे सरकारचे म्हणणे फेटाळत त्याची थोडी मात्राही आरोग्यास अपायकारक आहे असे स्पष्ट केले होते. मृतदेह टिकवण्यासाठी फॉर्मेलीन वापरण्यात येत असल्याची माहिती उघड झाल्यानंतर मासे खाणे कित्येकांनी सोडून दिले होते व राज्यभरातील मासे बाजार ओस पडले आहेत.

मुख्यमंत्री आज म्हणाले, फॉर्मेलीन किती आहे किंवा नाही या वादात सरकार पडणार नाही. यावर उपाय म्हणून बाहेरून आणल्या जाणाऱ्या माशांवर १५ दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मध्यरात्रीपासून गोव्याच्या सर्व सीमांवर सरकारी अधिकारी मासे आणणारी वाहने रोखतील.

Web Title: foreign fishes are ban at goa