होय! आम्ही त्यांच्या घरात घुसून मारले : भारत 

होय! आम्ही त्यांच्या घरात घुसून मारले : भारत 

नवी दिल्ली : 'येत्या काळात भारतामध्ये आणखी दहशतवादी हल्ले करण्याचा कट 'जैश ए महंमद'ने रचला होता. त्यामुळे देशाचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई गरजेची होती', असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आज (मंगळवार) स्पष्ट केले. बालाकोटमध्ये घुसून भारतीय हवाई दलाने पहाटे 'जैश'चे प्रशिक्षण तळ उध्वस्त केले. या दणक्‍यामुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताची भूमिका आणि या कारवाईमागील कारणे स्पष्ट केली. 'या हल्ल्यामध्ये जैश ए महंमदचे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर ठार झाले आहेत. बालाकोटच्या प्रशिक्षण तळावरील त्या संघटनेचे वरिष्ठ कमांडरही ठार झाले आहेत. जैश ए महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरचा भाऊ युसूफ अजहर हा या तळाचा प्रमुख होता. तो जिवंत आहे की नाही, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही', असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 

पाकिस्तानच्या 'जैश'ने पुलवामा येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर देशात इतरत्रही हल्ले करण्याचा त्या दहशतवादी संघटनेचा कट होता. यासाठी बालाकोटमधील तळावर प्रशिक्षण देण्याचे काम सुरू होते. याची माहिती मिळाल्यानेच भारताने ही कारवाई केली आहे. 

मात्र, या कारवाईला व्यापक युद्धाचे स्वरूप येऊ नये याचीही काळजी भारताने घेतली आहे. 'बालाकोटमधील तळ दाट जंगलामध्ये होता. फक्त त्या तळावरच हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्तीला आम्ही लक्ष्य केलेले नाही. ही प्रतिबंधात्मक कारवाई होती', असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com