'युपी'तील जंगलात सापडली 'वनकन्या'; उपचार सुरु

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

ती थेट तोंडाने अन्न खाते. दोन्ही पायांऐवजी ती हात आणि पायाने प्राण्यांसारखे चालते. तिला माणसांची भाषा समजत नाही. ती माणसांना पाहून दूर पळत असल्याची माहिती सिंह यांनी दिली. तिच्या त्वचेवर जखमा आहेत, त्यावरून ती काही काळ प्राण्यांसोबत राहिली असावी, असा अंदाज तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी व्यक्त केला आहे.

बहराईच (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील कतारणीयाघाट येथील जंगलात एक दहा वर्षाची मुलगी सापडली आहे. ही मुलगी माणसे पाहून दूर पळत असून प्राण्यांसारखे चालत आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्यात सुधारणा होत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे.

दोन महिन्यांपूर्वी बहराईच येथील जंगलात नियमित गस्तीवर असलेल्या पोलिसांना ही मुलगी आढळली. जंगली माकडांसोबत असलेल्या या मुलीला माणसांची भाषा समजत नव्हती. पोलिसांनी तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. तर तिच्यासोबतचे माकडे ओरडत होते. अनेक प्रयत्नांनंतर पोलिसांनी या मुलीची सुटका केली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. "तिची प्रकृती चांगली असून तिच्यामध्ये सुधारणा होत आहेत', अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डी. के. सिंह यांनी दिली.

तिच्यावर उपचार करताना ती अनेकदा हिंसक बनत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी सांगितले. ती थेट तोंडाने अन्न खाते. दोन्ही पायांऐवजी ती हात आणि पायाने प्राण्यांसारखे चालते. तिला माणसांची भाषा समजत नाही. ती माणसांना पाहून दूर पळत असल्याची माहिती सिंह यांनी दिली. तिच्या त्वचेवर जखमा आहेत, त्यावरून ती काही काळ प्राण्यांसोबत राहिली असावी, असा अंदाज तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Forest girl found in UP