माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांचे निधन

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांच्या निधनामुळे देशाने तसेच, पश्‍चिम बंगालने एक विद्वान व महान व्यक्तीमत्व गमावले असून, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर (वय 68) यांचे आज कोलकाता येथे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परीवार आहे.

कबीर हे सर्वोच्च न्यायालयाचे 39 वे सरन्यायाधीश होते. 2013 मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले होते. त्यांचा जन्म 29 सप्टेंबर 1948 मध्ये झाला होता. एलएलबी पदवी संपादन केल्यानंतर ते 1973 मध्ये कोलकाता बार असोसिएशनचे सदस्य बनले. येथून त्यांची कारकिर्द सुरु झाली. कोलकाता उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असणाऱ्या कबीर यांची 1990 मध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.

सरन्यायाधीश म्हणून कबीर यांची कारकीर्द विवादास्पद राहिली. कबीर यांनी जाणीवपूर्वक आपली पदोन्नती रोखल्याचा आरोप गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भास्कर भट्टाचार्य यांनी मागे केला होता. सहारा-सेबी, प्रकरणाची सुनावणी ज्या पीठासमोर सुरू होती. त्यात कबीर यांनी बदल करून ती आपल्या हातात घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.
 

Web Title: former cji altmas kabir passes away