नासिरुल मुल्क पाकचे काळजीवाहू पंतप्रधान 

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश नासिरुल मुल्क यांचे नाव देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून आज घोषित करण्यात आले. या घोषणेमुळे सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) आणि विरोधकांमध्ये असलेला राजकीय वाद संपुष्टात आला आहे. 
 

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश नासिरुल मुल्क यांचे नाव देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून आज घोषित करण्यात आले. या घोषणेमुळे सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) आणि विरोधकांमध्ये असलेला राजकीय वाद संपुष्टात आला आहे. 

पाकिस्तानमध्ये 25 जुलैला सार्वत्रिक निवडणूक नियोजित आहे. सध्याच्या सरकारचा कार्यकाल 31 मे रोजी संपत आहे. त्यामुळे नासिरुल मुल्क हे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत साधारण अडीच महिने काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कारभार चालवतील. विरोधी पक्षनेते खुर्शिद शाह आणि विद्यमान पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांनी आज पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. मुल्क (वय 67) यांचा एक जूनला शपथविधी होण्याची शक्‍यता आहे. मुल्क यांच्या नेतृत्वाखाली मुक्त आणि तटस्थ वातावरणात निवडणूक पार पडेल, अशी आशा अब्बासी यांनी व्यक्त केली. 

काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी नाव निश्‍चित करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये गेले काही आठवडे मतभेद सुरू होते. तब्बल सहा बैठका झाल्यानंतर मुल्क यांच्या नावावर एकमत झाले. मुल्क हे 2014 मध्ये पाकिस्तानचे 22 वे सरन्यायाधीश होते. संसद विसर्जित झाल्यापासून नवीन सरकार येईपर्यंत देशाचा कारभार योग्य रीतीने चालविणे हे काळजीवाहू पंतप्रधानाचे काम असते आणि ते काम मुल्क चांगल्यारीतीने करतील, असा विश्‍वास दोन्ही बाजूंकडून व्यक्त करण्यात आला.

Web Title: Former CJP Nasirul Mulk named caretaker PM