Umesh Pal Kidnapping Case : उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक अहमद दोषी; शिक्षा काय मिळणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atique Ahmed News

Umesh Pal Kidnapping Case : उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक अहमद दोषी; शिक्षा काय मिळणार?

Umesh Pal Kidnapping Case : प्रयागराजच्या स्पेशल एमपी-एमएलए कोर्टाने उमेश पाल अपहरण प्रकरणात निकाल दिला आहे. १७ वर्षे जुन्या या अपहरण प्रकरणात न्यायालयाने माफिया अतिक अहमदसह तीन आरोपींना दोषी ठरवले आहे, तर सात आरोपींना निर्दोष घोषित केले आहे. न्यायालयाने आज मंगळवारी दुपारी हा निकाल दिला आहे. आता अतिक अहमदला शिक्षा काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अतिक अहमद, सौलत हनिफ आणि दिनेश पासी यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर अश्रफसह सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

या प्रकरणात निकाल येण्याआगोदर उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनी पत्रकारांना सांगितले की, मी न्यायालयात जाणार नाही. मी माझ्या घरीच राहीन आणि अहमदला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रार्थना करेन. दरम्यान अहमद आणि अशरफ यांच्यावर २००५ मध्ये राजू पाल यांच्या हत्येचा मुख्य साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

काय प्रकरण आहे?

बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याच्याशी संबंधित खटल्यात न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. या प्रकरणात २८ फेब्रुवारी २००६ रोजी अतिक अहमद आणि अशरफ यांनी उमेश पाल यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे.

उमेश पाल यांना मारहाण केल्यानंतर, कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देऊन न्यायालयात बळजबरीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. २००७ मध्ये मायावतींचे सरकार स्थापन झाल्यानंतर ५ जुलै २००७ रोजी उमेश पाल यांनी अतिक आणि अशरफ यांच्यासह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला.

पोलिस तपासात आणखी सहा जणांची नावे समोर आली. अतिक आणि अशरफसह ११ जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी २००९ मध्ये सुरू झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार हजर करण्यात आले. या प्रकरणातील ११ आरोपींपैकी अन्सार बाबा नावाच्या आरोपीचा मृत्यू झाला आहे. अतीक आणि अशरफसह एकूण १० आरोपींविरोधात न्यायालयाने मंगळवारी आपला निकाल दिला आहे.