माजी पंतप्रधान म्हणाले, 'बाळासाहेबांनीच महाराष्ट्रात भाजपचे बस्तान बसवले!'

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

भाजपचे नेते लालकृष्ण अडवानी व अटलबिहारी वाजपेयी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाऊन शिवसेनेशी युती करण्याची इच्छा व्यक्त केली.

बंगळूर : ''दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच भाजपला महाराष्ट्रात स्थान मिळवून दिले. परंतु, आता भाजपला त्याची जाणीव राहिलेली नाही. काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा द्यायचा असेल, तर तो पाच वर्षे टिकवून ठेवावा, तरच लोक काँग्रेसवर विश्‍वास ठेवतील,'' असे मत माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (धजद) सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी सोमवारी (ता. 11) व्यक्त केले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर ते पत्रकारांशी बोलत होते. 

- राज ठाकरेंनी अशी वाहिली टी. एन. शेषन यांना श्रद्धांजली!

महाराष्ट्रातील जुन्या राजकीय घडामोडींचे स्मरण करून ते म्हणाले, 'दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच महाराष्ट्रात भाजपला बस्तान बसवून दिले. भाजपचे नेते लालकृष्ण अडवानी व अटलबिहारी वाजपेयी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाऊन शिवसेनेशी युती करण्याची इच्छा व्यक्त केली. राज्यात भाजपला काही जागा देण्याची विनंती केली. भाजपला आज त्याचे स्मरण राहिलेले नाही. यासाठीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार केला आहे.' 

- महाराष्ट्रात कधी, का लागली होती राष्ट्रपती राजवट? जाणून घ्या...

महाराष्ट्रात भाजपला खाली खेचण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अखिल भारतीय काँग्रेसला मिळालेली आहे. काँग्रेसने एकवेळ शिवसेनेला पाठिंबा दिला, तर पुढील पाच वर्षे कोणत्याही प्रकारच्या विरोधी हालचाली न करता सरकार टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. म्हणजेच, काँग्रेसवर तेथील लोकांचा विश्वास बसेल.

- हे बॉलिवूड सेलेब्स आहेत, अभिमानी 'सिंगल फादर'!

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या दारात गेलेली आहे. पुढे काय होते, याची प्रतीक्षा करावी लागेल, असे देवेगौडा यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former PM H D Devegowda made a statement about Balasaheb Thackeray and BJP