
आज आंदोलनाचा आठवा दिवस असला तरीही ऐन थंडीतही शेतकऱ्यांचा निश्चय अजिबातच ढळलेला नाहीये.
कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक महत्त्वपूर्ण बनत चालले आहे. आज आंदोलनाचा आठवा दिवस असला तरीही ऐन थंडीतही शेतकऱ्यांचा निश्चय अजिबातच ढळलेला नाहीये. यातच आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे वरिष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात आपला पद्मविभूषण हा सन्मान सरकारला परत केला आहे.
Former Punjab CM Parkash Singh Badal returns Padma Vibhushan to protest "the betrayal of the farmers by govt of India" pic.twitter.com/mzdsoAZSlC
— ANI (@ANI) December 3, 2020
प्रकाश सिंह बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जवळपास तीन पानाचे पत्र लिहून कृषी कायद्यांचा विरोध केला आणि शेतकऱ्यांवर केलेल्या अमानुष कारवाईचा निषेध करत आपला पद्मविभूषण हा पुरस्कार परत केला आहे. पद्मविभूषण परत करताना लिहलेल्या पत्रात त्यांनी लिहलंय की, मी इतका गरीब आहे की, शेतकऱ्यांसाठी त्याग करण्यासाठी माझ्याकडे आणखी काही नाहीये. मी जो काही आहे तो शेतकऱ्यांमुळेच आहे. अशावेळी जर शेतकऱ्यांचा अपमान होत असेल तर कोणत्याही प्रकारचा सन्मान स्वत: जवळ ठेवण्याचा कसलाही फायदा नाही.
हेही वाचा - "योगींच्या दौऱ्याने उद्धव ठाकरेंची झोप उडालीय, भाषेचा गैरवापर ही शिवसेनेची संस्कृती"
पुढे त्यांनी लिहलंय की, शेतकऱ्यांसोबत ज्या प्रकारची फसवणू केली गेलीय, त्यामुळे खुपच दु:ख झालं आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ज्याप्रकारे चुकीच्या दृष्टीकोनातून सादर केलं जात आहे ते वेदनादायी आहे. फक्त प्रकाश सिहं बादल यांनीच नव्हे तर अकाली दलाचे नेते सुखदेव सिंह ढिंढसा देखील आपला पद्मभूषण सन्मान भारत सरकारला परत करणार आहेत. याआधी बादल परिवारकडून कृषी कायद्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला आहे. हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तसेच केंद्राने या नव्या कायद्यांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असंही म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर सुखबीर सिंग बादल यांनी अकाली दल NDA पासून या मुद्यांचा विरोध करत फारकत घेत असल्याचं म्हटलं होतं. तसेच पंजाबमध्ये निवडणुकीत एकट्याने उतरणार असल्याचीही घोषणा केली होती.
हेही वाचा - RBI कडून HDFC ला पुन्हा झटका; क्रेडिट कार्डसह नव्या डिजीटल सेवांना मनाई
अकाली दल पंजाबमध्ये सातत्याने कृषी कायद्यांच्या विरोधत प्रदर्शन करत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे अकाली दलावर आरोप करत आले आहेत. अमरिंदर यांनी आरोप लावला होता की, जेंव्हा अकाली दल केंद्रात सरकारमध्ये सामिल होती तेंव्हा कायदा तयार होताना त्यांनी त्याला का विरोध केला नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला होता. केंद्र सरकारद्वारे पारित केल्या गेलेल्यात तिन्ही कायद्यांना सर्वाधिक विरोध हा पंजाबमध्येच केला जातोय. मागच्या दोन महिन्यांपासून पंजाबमधील शेतकरी रस्त्यावर आहे.