मोदींनी कोणाला चाहूल लागूच दिली नाही...

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मोदींनी 370 कलमाबाबत कोणाला चाहूल लागू न देता निर्णय घेतला. आजच्या निर्णयाची सुद्धा मोदींनी कोणाला चाहूल लागूच दिली नाही.

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोदी सरकार महत्त्वाच्या निर्णयांची माहिती सरकारमधील निवडक लोकांनाच देत आहे. मोदींनी 370 कलमाबाबत कोणाला चाहूल लागू न देता निर्णय घेतला. आजच्या निर्णयाची सुद्धा मोदींनी कोणाला चाहूल लागूच दिली नाही.

मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मोठा निर्णय घेतला आज (सोमवार) घेतला आहे. या निर्णयाची चाहूलही कोणालाही नव्हती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हलचालीवरून अनेकजण अंदाज बांधत होते. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या 11 दिवसांपासूने मोदी सरकार काश्मीरसंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या दृष्टीने वाटचाल करत होते. 26 जुलै रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल काश्मीर दौऱ्यावर गेले होते, त्यावेली काश्मीरबाबत मोठ्या निर्णयाचे संकेत मिळाले होते.

27 जुलै रोजी लष्कराच्या अतिरिक्त 100 कंपन्या पाठवण्याची घोषणा झाली. यानंतर काश्मीरमधील मशिदींच्या संख्येची माहिती घेण्यात आली. त्यानंतर सरकारने अमरनाथ यात्रेवर बंदी घातली आणि पर्यटक आणि भाविकांना काश्मीर खोरे सोडण्याची सूचना दिली. काश्मीरमध्ये 4 ऑगस्ट हालचालींना वेग आला. मोदी सरकार काश्मीरबाबत मंत्रिमंडळ बैठक बोलावणार असल्याचे वृत्त प्रसारित झाले. 4 आणि 5 ऑगस्टच्या रात्री काश्मीरमधील मोठमोठे नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. इंटरनेट सेवा ठप्प केली. काश्मीर खोऱ्यासह जम्मूमध्ये जमावबंदी (कलम 144) लागू करण्यात आले. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली, परंतु, नेमका कोणता निर्णय होणार आहे, हे कोणालाही समजले नाही.

आज सकाळी 9.30 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. सरकार यावेळीही काय निर्णय घेणार, याची कल्पना कोणालाच नव्हती. कॅबिनेट बैठकीआधी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी खलबते झाली. कायदे मंत्री आणि गृहमंत्री सकाळी साडेआठ वाजताच पोहोचले होते. यावेळी एनएसए अजित डोभाल आणि गृहसचिव राजीव गावाही उपस्थित होते. अखेर कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात झाली. पण तेव्हा देखील कोणालाही निर्णय काय होणार? याची माहिती नव्हती.

मोदी सरकारचे घेतलेले तीन मोठे निर्णय...
1. सर्जिकल स्ट्राईक : मोदी सरकारने 28 सप्टेंबर 2016 रोजी उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सैन्याने नियंत्रण रेषा पार करुन पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले.

2. नोटाबंदी : 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय सरकारने घेतला. मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी देशाला संबोधित करुन नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला.

3. एअरस्ट्राईक : 26 फेब्रुवारी, 2019 रोजी बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक करण्यात आला. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या सीमेत घुसून बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four big decisions of Modi Government that nobody knew about this