कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर चार तपासणी नाके 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

येथे होणार चेकपोस्ट नाके 

  • देवचंद महाविद्यालयासमोरील कोडणीरोड 
  • राष्ट्रीय महामार्गावरील आप्पाचीवाडी फाटा 
  • कोगनोळी टोलनाका 
  • बोरगाव 

निपाणी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निपाणी विधानसभा मतदार संघात कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर चार चेक पोस्ट नाके उभारले जाणार आहेत. चेकनाक्‍यामुळे निवडणूक काळातील आंतरराज्य अवैध तस्करीला मात्र लगाम बसणार चारही ठिकाणी नाके उभारण्यासाठी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. 

निपाणी विधानसभा मतदार संघ राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदार संघ असून तो महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. अशातच येथून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने अवैध वाहतुकीसह तस्करी मोठ्या प्रमाणात चालते. निवडणूक काळात अशा अवैध वाहतुकीसह तस्करीवर निर्बंध यावेत, यासाठी निवडणूक विभागाने नियोजित नाक्‍यांची पाहणी करून ठिकाणे निश्‍चित करण्यास सांगितले होते.

पोलिस प्रशासन व भरारी पथकाने नाक्‍यांची स्थळे निश्‍चित केली असून निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच चेकपोस्ट नाके उभारण्याचे कामकाज चालणार आहे. 

देवचंद महाविद्यालयापासून पुढे महाराष्ट्रातील मुरगूड तर कोडणी रस्ता पुढे चिखलीला मिळतो. अप्पाचीवाडी फाट्यावरुन कुर्ली, अप्पाचीवाडीसह महाराष्ट्रातील म्हाकवे व अन्य गावात मोठी वाहतूक चालते. कोगनोळी टोलनाका तर महाराष्ट्राच्या सीमेवरील आणि महामार्गावरील महत्वाचा नाका आहे.

याशिवाय बोरगाव येथून इचलकरंजीसह भागात वाहतूक मोठी असते. निवडणूक काळात मतदारांना आमिषे दाखविण्यासाठी वेगवेगळे साहित्य, रोकड, मौल्यवान वस्तू, मद्य अशा माध्यमातून मोठी आंतरराज्य तस्करी चालते. ती रोखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी म्हणून चेकपोस्ट नाके उभारले जातात. यापूर्वी चेकपोस्ट नाक्‍यांवर अवैध वाहतूक प्रकरणी मुद्देमालासह वाहने जप्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

आचारसंहितेचे कोणाकडूनही उल्लंघन होऊ नये, यासाठी निवडणूक प्रशासनाची प्रत्येक बाबीवर करडी नजर असणार आहे. चेकपोस्ट नाक्‍यावर भरारी पथकासह पोलिस व होमगार्ड कार्यरत असणार आहेत. शिवाय प्रत्येक नाक्‍यावर सीसी कॅमेरे बसविले जाणार आहेत. 

येथे होणार चेकपोस्ट नाके 

  • देवचंद महाविद्यालयासमोरील कोडणीरोड 
  • राष्ट्रीय महामार्गावरील आप्पाचीवाडी फाटा 
  • कोगनोळी टोलनाका 
  • बोरगाव 
Web Title: Four check posts on the Karnataka-Maharashtra border