Nobel Prize : या चार भारतीय शास्त्रज्ञांना नाकारले 'नोबेल'!

सम्राट कदम
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नोबेल पारितोषिक निश्‍चितच मोलाचे आहे, पण याच्या वितरणात होणारे राजकारण नेहमीच चर्चेत येते. तथाकथित तिसऱ्या आणि दुसऱ्या जगातील वैज्ञांनिकांचे योग्य मूल्यमापन होणार की नाही? हा मोठा प्रश्‍न आहे.

पुणे : नोबेल पारितोषिकाच्या स्थापनेपासून गेल्या शंभर वर्षात फक्त एकाच भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल देण्यात आले. ते म्हणजे 'चंद्रशेखर व्यंकट रामन'! त्यांच्या व्यतिरिक्त देशात अजून चार असे शास्त्रज्ञ होऊन गेले, की ज्यांचे नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झाले, पण त्यांना ते नाकारण्यात आले. नोबेल सन्मान जितका प्रतिष्ठेचा आहे, तितकाच तो वादग्रस्तसुद्धा आहे. 

1. सत्येंद्र नाथ बोस

Image may contain: 1 person, glasses and close-up

'गॉड पार्टिकल'ला म्हणजेच 'बोसॉन'या कणांना ज्यांचे नाव दिले, असे प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस (1894-1974) यांना नोबेल सन्मान नाकारण्यात आला होता. पदार्थाची नवीन अवस्था शोधणारे बोस यांचे संशोधन 'बोस-आइन्स्टाईन कंडेनसेशन' म्हणून 'संख्याशास्त्रीय गतिशास्त्रा'त (स्टॅटिस्टीकल मेकॅनिक्‍स) महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांचे संशोधन पदार्थविज्ञानातील मूलभूत संशोधन म्हणून ओळखले जाते. तब्बल चार वेळेला नामांकन होऊनही नोबेल समितीने त्यांना हा सन्मान नाकारला. 

2. मेघनाद साहा

Image may contain: 1 person, glasses, suit and close-up

रात्रीच्या अवकाशात लुकलुकणारे तारे आपण नेहमीच पाहतो, पण या ताऱ्यांमध्ये असलेल्या पदार्थांची माहिती आपल्याला एका भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे मिळते, त्यांचे नाव आहे, मेघनाद साहा! त्यांनी ताऱ्यांमधून बाहेर पडणारी किरणे आणि ताऱ्याचे तापमान यांतील सहसंबंध शोधला. त्यामुळे हजारो प्रकाशवर्षे दूर असलेल्या ताऱ्यातील घटकांचा आपण शोध घेऊ शकतो. ही समीकरणे 'साहा समीकरणे' म्हणून अवकाश विज्ञान जगतात प्रसिद्ध आहे.

मेघनाद साहा यांच्यामुळेच ब्रम्हांडाच्या सुरवातीच्या कालावधीवर प्रकाश टाकता आला आहे. ब्रम्हांडाची उत्पत्ती, सुरवातीचे ग्रह, तारे यांचा इतिहास साहा यांच्यामुळे उलगडला आहे. मेघनाद साहा यांचे नाव तब्बल सहा वेळा नोबेल पारितोषिकाच्या शर्यतीत होते. 1930, 1937, 1939, 1940, 1951 आणि 1955 यावर्षीच्या नोबेल समितीने त्यांना हा सन्मान नाकारला.

3. ई. सुदर्शन

Image may contain: 1 person, text

'क्वांटम ऑप्टिक्‍स'मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करणारे ई. सुदर्शन यांनासुद्धा नोबेल सन्मान नाकारण्यात आला. प्रकाशाच्या पुंज्यभौतिकी रुपाचा मूलभूत अभ्यासाची समीकरणे सुदर्शन यांनी मांडली. त्यांच्याच क्वांटम ऑप्टीक्‍समधील संशोधनावर आधारीत शोधाला 1979 साली नोबेल सन्मान देण्यात आला. पण त्यात त्यांचे नाव नव्हते.

2005 साली स्वीडिश ऍकॅडमीमध्ये शेकडो वैज्ञानिकांनी पत्र लिहून सुदर्शन यांना हा सन्मान द्यावा म्हणून विनंती करण्यात आली, पण तरीही त्याना नोबेल सन्मान नाकारण्यात आला. 

4. नरेंद्रसिंग कंपनी

Image may contain: 1 person

एकविसावे शतक माहितीचे अथवा संगणकाचे शतक म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये 'ऑप्टिकल फायबर'हा एक परवलीचा शब्द झाला आहे. ऑप्टिकल फायबरचे निर्माते असलेले पंजाबी शास्त्रज्ञ नरेंद्रसिंग कंपनी यांना नोबेल सन्मानापासून वंचित ठेवण्यात आले. त्यांच्या संशोधनामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली; परंतु त्यांना 'नोबेल' सन्मान अनेकदा नाकारण्यात आला. त्यांच्या ऐवजी चार्ल्स नावाच्या विदेशी संशोधकाला नोबेल देण्यात आले. 

या भारतीय शास्त्रज्ञांची नावे प्रत्यक्ष निवड समितीसमोर आली होती, पण त्यांच्या व्यतिरिक्तही अनेक भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. यामध्ये जगदीशचंद्र बसू, रामानुजन, रे, भटनागर, चंद्रशेखर अशा अनेक शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

नोबेल पारितोषिक निश्‍चितच मोलाचे आहे, पण याच्या वितरणात होणारे राजकारण नेहमीच चर्चेत येते. तथाकथित तिसऱ्या आणि दुसऱ्या जगातील वैज्ञांनिकांचे योग्य मूल्यमापन होणार की नाही? हा मोठा प्रश्‍न आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- INDvsSA : मयांकचे शतक; भारताचे दुसऱ्या सत्रात वर्चस्व

- आयकॉनीक रेखाचे 5 करिअर डीफायनिंग रोल...

- #ThursdayMotivation : इथे मोफत शिकवतात चिनी भाषा! (व्हिडिओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Indian scientists could not get the Nobel Prize