ओडिशात 4 नक्षलवादी ठार; 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

नक्षलवादी व सुरक्षा दलात चकमक झाली. ज्यात तीन महिला नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

ओडिशातील कोरापूत येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मृतांमध्ये 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ओडिशातील नारायणपाटना येथील डोकरी घाटी येथे नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. रविवारी (ता. 25) रात्री सुरक्षा दलाच्या विशेष पथकातील (स्पेशल ऑपरेशन ग्रुप) जवानांनी कोरापूत परिसरात शोधमोहीम राबवली. 

या दरम्यान नक्षलवादी व सुरक्षा दलात चकमक झाली. ज्यात तीन महिला नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तिन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह रविवारी रात्रीच पोलिसांच्या हाती लागले. तर आज (ता. 26) सकाळी आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. या परिसरात सुरक्षा दलाचे जवान अजूनही शोधमोहीम राबवत आहेत. 'घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि नक्षली साहीत्य जप्त करण्यात आले,' असे येथील पोलिस महानिरीक्षकांनी सांगितले आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले होते. त्यानंतर ओडिशा, छत्तीसगड येथील नक्षलवाद्यांचे वर्चस्व असलेल्या भागांमध्ये पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. 

Web Title: Four Maoists killed in Odisha encounter during search operation by police