अनंतनागमधील चकमकीत चार दहशतवादी ठार

पीटीआय
शनिवार, 23 जून 2018

अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफवारा गावात ही घटना घडली. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांनी आज सकाळी या भागाला चारही बाजूंनी वेढा घालत शोध मोहीम सुरू केली. जवान जवळ येत असल्याचे दहशतवाद्यांना समजल्यावर त्यांनी जवानांवर गोळीबार केला.

श्रीनगर : इस्लामिक स्टेट जम्मू काश्‍मीर (आयएसजेके) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख दाऊद इब्राहिम सोफी याच्यासह चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी आज चकमकीत ठार मारले. या चकमकीत एक पोलिस हुतात्मा झाला, तर एक नागरिक मारला गेला, तर तीन जण जखमी झाले. अमरनाथ यात्रा सुरु होण्याच्या सहा दिवस आधी ही घटना घडली आहे. 

अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफवारा गावात ही घटना घडली. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांनी आज सकाळी या भागाला चारही बाजूंनी वेढा घालत शोध मोहीम सुरू केली. जवान जवळ येत असल्याचे दहशतवाद्यांना समजल्यावर त्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली. या चकमकीत "आयएसजेके'चा प्रमुख दाऊद आणि इतर तीन दहशतवादी मारले गेले. आदिल रहमान भट, महंमद अश्रफ इटू आणि माजिद मन्झूर दार अशी या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. या चकमकीत पोलिस दलाचे आशिक हुसेन हुतात्मा झाले, तर महंमद युसूफ राठर या नागरिकाचा मृत्यू झाला. सोफी (वय 33) या श्रीनगरचा रहिवासी असून त्याच्यावर खून आणि जवानांवर दगडफेक केल्याचे गुन्हे आहेत. सहायक उपनिरीक्षक गुलाम महंमद आणि हेड कॉन्स्टेबल नासीर अहमद यांच्या हत्यांमध्ये त्याचा सहभाग होता. 

दरम्यान, चकमक सुरू असताना काही युवकांनी जवानांवर दगडफेक करण्यास सुरवात केली. त्यामुळे त्यांना पांगविण्यासाठी जवानांना बळाचा वापर करावा लागला. चकमक संपली असली तरी येथील परिस्थिती तणावग्रस्त असून, अफवा पसरू नये म्हणून प्रशासनाने श्रीनगर, अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four militants killed in Anantnag encounter