काश्‍मीरमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार

काश्‍मीरमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार

श्रीनगर : शोपियॉं जिल्ह्यात जवानांनी मंगळवारी सकाळी केलेल्या जोरदार कारवाईत हिज्बुल मुजाहिदीनचे चार दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. याशिवाय अन्य दोन जवान जखमी झाले. 

शोपियॉं जिल्ह्यातील नादिगाममध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दल आणि पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने परिसराला वेढा घातला. शोधमोहीम सुरू केली आणि परिसराची नाकाबंदी केली. या वेळी दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्हीकडून होणाऱ्या गोळीबारात निमलष्करी दलाचे कमांडो एच. सी. विजय यांना गोळी लागली. ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले, परंतु तेथे निधन झाले. त्याच वेळी सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांना मारले.

मृत दहशतवाद्यांची ओळख पटली असून, आबिद नजीर चोपन, बशरत नेंगरू, मेहराज उद दीन नजर आणि मलिकझादा इनाम उल हक अशी त्यांची नावे आहेत. सर्व दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीनचे आहेत. मृत दहशतवादी हे भारतीय लष्करांच्या ठिकाणांवर हल्ले घडवून आणण्यात सहभागी होते.

घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटकसाहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चकमकीच्या ठिकाणी आणखी स्फोटके असण्याची शक्‍यता वर्तविली जात असल्याने नागरिकांना दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान जखमी 

पाकिस्तानकडून मंगळवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. पूँच आणि राजौरी जिल्ह्यांत प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. पूँच सेक्‍टरमधील मालती सेक्‍टर आणि फिगवार येथे तोफगोळ्याचा मारा केला. त्यात एक जवान जखमी झाला.

एक तोफगोळा पूँच शहरात पडल्याचे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले. दुसऱ्या घटनेत राजौरी जिल्ह्यातील नौशरे सेक्‍टरमध्ये लाम बेल्ट येथे पाकिस्तानच्या स्नायपरनी गोळीबार केला. त्यात एक जवान जखमी झाला असून, त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com