कारखान्यातील स्फोटात चार जण ठार, 8 जखमी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मांजरी : मद्यनिर्मिती करणाऱ्या बॉयलरचा स्फोट होऊन चार कामगार ठार, तर नऊ वर्षांच्या बालकासह 8 जण गंभीर जखमी झाले. मुधोळजवळील (जि. बागलकोट) कुरली येथील निराणी साखर कारखान्यात आज ही दुर्घटना घडली. अचानक झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण मुधोळ हादरून गेले. स्फोटाची तीव्रता अधिक असल्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

नागाप्पा बाळाप्पा धर्मट्टी (वय 44), शिवानंद इराप्पा होसमठ, जगदीश पट्टणशेट्टी (वय 32), शरणबसप्पा तोट्टद (वय 35) अशी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहे. तर, लक्ष्मप्पा मलनायक, सिद्धापा पाटील, रमेश जाधव, मधुकर घोरपडे, सतीश गणी, सैदूसाब होसमनी, मोहनसिंग बिहारी, मनोज होसमठ (वय 9) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर तातडीने प्रथमोपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. दरम्यान, जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, या साखर कारखान्यात एक हजाराहून अधिक कामगार काम करतात. तर, स्फोट झालेल्या डिस्टलरी शाखेत 20 हून अधिक कामगार कार्यरत होते. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशामक दल, रुग्णवाहिकांना पाचारण केले. त्यांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले. कारखान्यात ज्या ठिकाणी बॉयलर होते, तेथील भिंती नेस्तनाबूत झाल्या आहेत. तर, लोखंडी साहित्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. स्फोटावेळी ढिगाऱ्याखाली आणखीन कामगार अडकले आहेत का, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे क्रेनच्या साहाय्याने ढिगारे हटविण्याचे काम सायंकाळी उशिरार्पंत सुरू होते. 

Web Title: Four people were killed and 8 others injured in factory explosion