पुलवामा : दोन फरारी पोलिस अधिकाऱ्यांसह चारजण ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जून 2019

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लासिपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यामध्ये आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या चकमकीत दोन फरारी पोलीस अधिकारी आणि चार दहशतवादी ठार करण्यात आले.

पुलवामा : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लासिपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यामध्ये आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या चकमकीत दोन फरारी पोलीस अधिकाऱ्यांसह चारजणांना ठार करण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. 

काल (गुरुवार) दुपारी पुलवामाच्या पंजरण लासिपोरा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहिम हाती घेतली होती. आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांना पाहिल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

चकमकीला सुरूवात झाल्यानंतर दोन विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) रायफल घेऊन पोलीस लाईनमधून गायब झाल्यानंतर ते दहशतवाद्यांना जाऊन मिळाले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. 

शुक्रवारी सकाळी एक दहशतवादी आणि दोन फरारी पोलीस अधिकारी यांना घेराव घालून ठार करण्यात आले. चकमकीत ठार करण्यात आलेल्या चारही जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल, सीआरपीएफ आणि एसओजीच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four terrorists killed in encounter in Jammu and Kashmir's Pulwama