काश्‍मिरात हल्ल्याचा कट उधळला

चार दहशतवादी मारले गेले; ‘सीआयएसएफ’चा अधिकारी हुतात्मा
terrorists were killed CISF officer killed Kashmir
terrorists were killed CISF officer killed Kashmirsakal

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सांबा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने सुरक्षा व्यवस्थेत वाढ केलेली असताना जैशे महंमदच्या दहशतवाद्यांनी चढ्ढा छावणी परिसरात सीआयएसएफच्या ताफ्यावर हल्ला केला. यात सीआयएसएफचा एक अधिकारी हुतात्मा झाला. तसेच सुजनवा शिबिराजवळ झडतीसत्र राबवताना झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा सापडल्याने मोठा हल्ला घडवून आणण्याचा कट दहशतवाद्यांनी केला असावा आणि तो आजच्या कारवाईने उधळला गेला, असे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

सुजनवा छावणी परिसरातील कारवाईनंतर जम्मूच्या पाच किलोमीटर परिसरात खबरदारीचे उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आणि तसेच खासगी आणि सरकारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले. अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंह म्हणाले, की सुजनवा शिबिराजवळ दोन सशस्त्र दहशतवाद्यांना ठार करण्याबरोबरच एक मोठा आत्मघातकी हल्ला रोखण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता. त्यामुळे ते आत्मघातकी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत होते. परंतु आजच्या कारवाईने त्यांचा कट उधळून लावला गेला आहे. दोन एके -४७ रायफल्स, एक अंडर बॅरल ग्रेनेड लॉंचर, सॅटेलाइट फोनही जप्त करण्यात आले. त्यानंतरही परिसरात झडतीसत्र सुरू होते. दहशतवाद्यांचे टार्गेट काय होते आणि त्यांनी भारतात कधी घुसखोरी केली होती, हे पाहणे आवश्‍यक असल्याचेही मुकेश सिंह म्हणाले. मृत दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून ते जैशे महंमदच्या संघटनेशी संबंधित असावेत, असा संशय व्यक्त होत आहे. या चकमकीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह नऊ कर्मचारी जखमी झाले.

अन्य घटनेसंदर्भात औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) च्या अधिकाऱ्याने सांगितले की, पंधरा जवानांना ड्यूटीवर घेऊन जाणाऱ्या बसवर चढ्ढा छावणी परिसरात शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. बसवर गोळीबार केला आणि ग्रेनेड फेकला. यात सहायक उपनिरीक्षक एस.पी.पटेल हुतात्मा झाले तर बसमध्ये असलेले दोन जण जखमी झाले. यावेळी सुरक्षा दलाने चोख उत्तर दिले. सीआयएसएफचा एक जवान आणि एका पोलिस कर्मचाऱ्याला गंभीर मार लागला आहे. सीआयएसएफच्या जोरदार प्रतिहल्ल्यामुळे दहशतवादी पळून गेले

आणि परिसरातील मोहंमद अन्वरच्या घरात घुसले. या घराला सुरक्षा दलाने वेढा घातला आणि एका दहशतवाद्याला ठार केले. अन्य एका साथीदाराने देखील सुरक्षा दलावर गोळीबार करणे सुरूच ठेवले. तोही मारला गेला.

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे कडक सुरक्षा

येत्या २४ एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सांबापासून काही अंतरावर पाली गावात सभेत बोलणार आहेत. दहशतवादी त्यामुळेच कारस्थान रचत असल्याची खबर सुरक्षा दलाला लागली होती. यानुसार परिसराला वेढा घालण्यात आला होता. यादरम्यान तपासणी मोहीम सुरू असताना गोळीबार सुरू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. जैशे महंमदचे तीन दहशतवादी १० फेब्रुवारी २०१८ रोजी सुजनवा शिबिरात घुसले होते. त्यावेळी झालेल्या चकमकीत सहा जवानांसह सात जण मारले गेले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com