आनंद महिंद्रांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल, स्कॉर्पिओ गाडीच्या अपघातात मुलाचा मृत्यू झाल्याने बापानं उचललं पाऊल |Fraud Complaint has registered against Anand Mahindra and 13 members of Company | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anand Mahindra

आनंद महिंद्रांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल, स्कॉर्पिओ गाडीच्या अपघातात मुलाचा मृत्यू झाल्याने बापानं उचललं पाऊल

Anand Mahindra Fraud Case:उत्तरप्रदेशच्या कानपुरध्ये एका व्यक्तीने आनंद महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या 13 कर्मचार्‍यांविरुद्ध रायपुरवा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने आरोप केलाय की महिंद्राच्या कर्मचाऱ्यांनी एअरबॅगशिवाय स्कॉर्पिओ विकली, त्यामुळे त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा अपघातात मृत्यू झाला.

जुही या ठिकाणी राहणाऱ्या राजेश मिश्रा यांनी सांगितले की, 2 डिसेंबर 2020 रोजी त्यांनी जरीब चौकी येथील तिरुपती ऑटोमधून 17.39 लाख रुपयांची काळी स्कॉर्पिओ खरेदी केली होती. कंपनीकडून वाहनाची वैशिष्ट्ये आणि सुरक्षिततेबाबत माहिती देण्यात आली. आनंद महिंद्रा यांनी विविध सोशल मीडियावर दाखवलेली जाहिरातही त्यांनी पाहिली होती.

त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा डॉ. अपूर्व मिश्रा याला स्कॉर्पिओ भेट दिली होती. 14 जानेवारी 2022 रोजी, अपूर्व लखनौहून कानपूरला मित्रांसह परतत असताना धुक्यामुळे कार डिवायडरला धडकली आणि उलटली. या अपघातात अपूर्वचा मृत्यू झाला.

29 जानेवारी रोजी त्यांनी तिरुपती ऑटोमध्ये जाऊन कारमधील दोषांची माहिती दिली आणि अपघाताच्या वेळी सीटबेल्ट लावलेला असतानाही एअरबॅग ओपन न झाल्याची तक्रार केली आणि फसवणूक केल्याचा आरोपही केला. वाहनाची नीट तपासणी केली असती तर आपल्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला नसता, असे राजेश मिश्रा यांनी सांगितले.

या मुद्द्यावर बोलत असताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वाद घातला आणि त्यानंतर त्यांनी संचालक चंद्र प्रकाश गुरनानी, विक्रम सिंग मेहता, राजेश गणेश जेजुरीकर, मुथय्या मुरगप्पन मुथय्या, विशाखा निरुभाई देसाई, निस्बाह गोदरेज, आनंद गोपाल महिंद्रा यांना कॉल करुन घडलेल्या सर्व प्रकरणाची माहिती सांगितली. संचालकांच्या सांगण्यावरून कंपनीचे व्यवस्थापक आदींनी राजेश मिश्रा व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मिश्रांनी केला आहे.

अपघातानंतर स्कॉर्पिओ उचलून रुमा येथील महिंद्रा कंपनीच्या शोरूममध्ये उभी करण्यात आली. कंपनीने वाहनात एअरबॅग लावल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी तांत्रिक तपासणी करण्यात येणार असल्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

टॅग्स :crime