नीरवची अशीही "हिरा'फेरी ; स्वत:च्याच चार कंपन्यांमध्ये व्यवहार

Fraudness of Nirav Modi
Fraudness of Nirav Modi

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या नीरव मोदी या हिरे व्यावसायिकाचा आणखी गोलमाल व्यवहार समोर आला आहे. नीरवने तीन कॅरेटचा एकच पिवळ्या रंगाचा हिरा त्याच्याच मालकीच्या चार कंपन्यांना विकला, हाच व्यवहार "पीएनबी'तील गैरव्यवहाराचे मूळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नीरवने 2011 मध्ये पाच आठवड्यांच्या अवधीत उपरोक्त व्यवहार केला होता, असे अमेरिकी बॅंकेतील दिवाळखोरी प्रक्रियेच्या निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. या हिऱ्याच्या खरेदी विक्रीचा खोटा आर्थिक व्यवहार पुढे आणखी कर्जे मिळविण्यासाठी वापरण्यात आला, असे अमेरिकेच्या "सिक्‍योरिटी अँड एक्‍सचेंज कमिशन' आणि न्याय विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नीरवने 2011 ते 2017 या काळामध्ये एकूण 21.38 कोटी डॉलरची बनावट बिले तयार केली. याच्याच आधारावर त्याने "पीएनबी'कडून "लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज'च्या माध्यमातून कर्ज घेतले. नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विविध व्यवहारांची बनावट बिले तयार करून परदेशातही तब्बल चार अब्ज डॉलर एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज घेतले. नीरवने काही हिरे आणि अन्य रत्ने भारतात आणण्यासाठी त्याच्या मालकीच्या 20 गुप्त शेल कंपन्यांचा वापर केला असे निरीक्षण जॉन जे. कार्ने यांनी त्यांच्या अहवालात नोंदविले आहे. 

या कंपन्यांचा समावेश 

ऑगस्ट 2011 मध्ये हाच पिवळा हिरा अमेरिकी कंपनी "फायरस्टार डायमंड'ला विकण्यात आला होता. पुन्हा तो हॉंगकॉंग येथील "फॅन्सी क्रिएशन' नावाच्या शेल कंपनीकडे पाठविण्यात आला. येथे त्याची किंमत अकरा लाख रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले. दोन आठवड्यांनंतर हाच हिरा "सोलर एक्‍स्पोर्ट कंपनी'कडे पाठविण्यात आला. या व्यवहारांमध्ये सहभागी झालेल्या वीस कंपन्या या नीरवच्याच मालकीच्या होत्या. 

अनधिकृत मार्गाचा अवलंब 

नीरवच्या अमेरिकेतील कंपन्यांनी हिऱ्यांची निर्यात करताना अधिकृत आणि पारंपरिक मार्गाचा अवलंब केला नव्हता. या व्यवहारांमध्ये अधिकृत कुरिअर कंपन्यांऐवजी "फेडएक्‍स'चा वापर करण्यात आला. यात सतरा लाख डॉलर किंमतीच्या सतरा कॅरेटच्या हिऱ्याचाही समावेश होता. यात फेडएक्‍सने मात्र केवळ 1.5 लाख डॉलरचाच विमा उतरविला होता. यामुळे "पीएनबी'चा नीरवच्या संपत्तीवरील हक्क आणखी मजबूत होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com