Women's Day 2023 : राजस्थानी घुंगट ते रॅम्प वॉकपर्यंत या स्त्रीचा 'सुई-धागा' वाला खरा अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inspirational Women's of India

Women's Day 2023 : राजस्थानी घुंगट ते रॅम्प वॉकपर्यंत या स्त्रीचा 'सुई-धागा' वाला खरा अनुभव

Inspirational Women's of India : राजस्थानमधील बारमेरमधील रावतसर या छोट्याशा गावात राहणाऱ्या रुमा देवी या ३० वर्षीय फॅशन डिझायनर यांच्या आयुष्याची कहाणी त्यांच्या राज्याप्रमाणेच बहुरंगी आहे. वयाच्या ५ व्या वर्षी त्यांनी आपल्या आईला गमावले आणि वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर त्या आपल्या आजीसोबत राहित होत्या आणि त्यांच्याकडून टेलरिंग शिकले.

घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, अशात आठवीनंतर त्यांचा अभ्यास सुटला आणि गावातील रितीरिवाजानुसार २००६ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. पण लग्नानंतरही रुमाचा त्रास संपला नाही. त्यांच्या सासरचे लोक शेतीवर अवलंबून होते, कोणतीही लक्षणीय बचत नव्हती. संयुक्त कुटुंबाचा खर्च मोठ्या कष्टाने चालत होता.

२००८ मध्ये रुमाने पहिल्या मुलाला जन्म दिला. पण आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी त्या निरागस मुलाला दोन दिवसांनी गमावले. रुमाला हा धक्का सहन होत नव्हता आणि मग तिने काम करण्याचा निर्णय घेतला.

१००-१०० रुपये जमवून कामाला सुरुवात केली आणि फॅशन डिझायनर झाली

रुमाने आजूबाजूच्या सुमारे १० महिलांना एकत्र केले आणि त्यांच्यासोबत एक बचत गट तयार केला. प्रत्येकाने १००-१०० रुपये जमवून सेकंड हँड शिलाई मशीन विकत घेतले आणि आपापल्या गोष्टी तयार करायला सुरुवात केली. कपडे तर तयार झाले, पण विकायचे कुठे?

त्यानंतर रुमाने दुकानदारांशी बोलून त्यांना थेट त्यांच्याकडून उत्पादने विकण्यास राजी केले. अशा प्रकारे त्यांना हळूहळू काम मिळू लागले. या कामाच्या संदर्भात, २००९ मध्ये रुमा देवी ग्रामीण विकास आणि चेतना संस्थेत पोहोचल्या, जिथे त्यांची भेट संस्थेचे सचिव विक्रम सिंह यांच्याशी झाली. यानंतर रुमा आणि तिच्या सहकारी महिला या संस्थेचा भाग झाल्या.अधिकाधिक महिलांनी स्वावलंबी व्हावे अशी रुमाची इच्छा होती. पण, ते अजिबात सोपे नव्हते.

त्या गावातल्या बाईच्या घरी पोहोचली की घरातील पुरुष त्यांना आत जाऊ देत नसत. रुमा आपल्या घरातील बायकांना बिघडवेल असे त्यांना वाटायचे. पण रुमाच्या हिंमतीपुढे त्यांना नतमस्तक व्हावे लागले. हळूहळू महिलाही त्यांच्यात सामील होऊ लागल्या आणि मग जेव्हा या महिलांना त्यांच्या मेहनतीचे पैसे मिळाले तेव्हा गावातील लोकही फॅशन डिझायनर रुमा देवी यांच्यावर विश्वास ठेवू लागले.

आज रुमा देवींच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय मागणी आहे.

काही काळानंतर रुमा यांना इंस्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड अवेअरनेसचे अध्यक्ष बनवण्यात आले. आता रुमाला बाडमेरच्या महिलांबद्दल देशात आणि परदेशातही ओळख हवी होती. यासाठी त्यांनी पारंपारिक शिवणकामाला आधुनिक फॅशनशी जोडले आणि राजस्थानमध्ये जिथे जिथे प्रदर्शने किंवा हस्तकला मेळावे भरवले जातात तिथे या उत्पादनांचे स्टॉल लावायला सुरुवात केली.

२०१५ मध्ये त्यांना 'राजस्थान हेरिटेज वीक'मध्ये जाण्याची संधी मिळाली. इथे, जेव्हा आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर अब्राहम अॅँड ठाकूर आणि भारताचे प्रसिद्ध डिझायनर हेमंत त्रिवेदी यांचे मॉडेल त्यांचे कपडे परिधान करून रॅम्प वॉक करत होते तिथे रुमा स्वतः आणि तिच्या इतर महिला रॅम्पवर आल्या तेव्हा लोकांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या.

त्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या फॅशन वीकसाठी ५ मोठ्या डिझायनर्सनी स्वत: तिच्याशी संपर्क साधला आणि तिला त्यांचे डिझाईन केलेले कपडे बनवायला सांगितले आणि रुमाचे नाव मोठे झाले.

फॅशन डिझायनर रुमा यांच्या नेतृत्वाखाली या राजस्थानी महिलांनी आतापर्यंत जर्मनी, कोलंबो, लंडन, सिंगापूर, थायलंड आदी देशांतील फॅशन शोमध्ये भाग घेतला आहे. आता या संस्थेच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही मागणी आहे. आज २२,००० हून अधिक महिला कारागीर रुमा देवींशी संलग्न आहेत.

२०१८ मध्ये रुमा यांना नारी शक्ती पुरस्कारही देण्यात आला होता. त्या म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धैर्य असणे आणि आपल्या कौशल्यांना आपली ओळख बनवून स्वावलंबी होणे.