इंधनदरातील घसरण सुरूच

इंधनदरातील घसरण सुरूच

नवी दिल्ली : इंधनदरात सलग सहा आठवडे सुरू असलेल्या कपातीमुळे दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर 73.57 रुपयांवर घसरला. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव गडगडल्याने ही कपात सुरू असून, एप्रिलनंतर प्रथमच दिल्लीत पेट्रोलचा दर 74 रुपयांखाली आला. 

दिल्लीत पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 50 पैसे कपात करण्यात आली. याचबरोबर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 40 पैसे कपात करण्यात आल्याने तो प्रतिलिटर 68.89 रुपयांवर आला. मुंबईत पेट्रोलचा दर आज प्रतिलिटर 79.12 रुपये आणि डिझेलचा दर 71.71 रुपये होता. सलग सहा आठवड्यांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 9.26 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 7.2 रुपये कपात झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात 18 ऑक्‍टोबरपासून घसरण होत आहे. इंधनदरात 16 ऑगस्टपासून दोन महिन्यांच्या कालवधीत झालेली वाढ आता पूर्णपणे कमी झाली आहे. 

देशभरात 16 ऑगस्ट ते 4 ऑक्‍टोबर या कालावधीत पेट्रोलचा दर 6.86 रुपये आणि डिझेलचा दर 6.73 रुपयांनी वाढला होता. इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती; तसेच विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीच्या भडक्‍यासाठी सरकारला जबाबदार धरले होते. सरकारने सुरवातीला इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करण्यास नकार दिला होता.

नंतर जनतेतील वाढता असंतोष पाहून केंद्र सरकारने 4 ऑक्‍टोबरला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 1.50 रुपये कपात केली होती. यानंतर अनेक राज्यांनी इंधनावरील स्थानिक करात कपात केली होती. यामुळे इंधनदर काही प्रमाणात कमी झाले होते. 

आणखी दर घसरणार 

जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात सातत्याने घसरण सुरू आहे. हा भाव प्रतिबॅरल 60 डॉलरच्या आसपास असल्याने आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री दरात कपात सुरूच राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे जनतेला आगामी काळात दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com