
Rahul Gandhi : मी जर शांत राहिलो तर, संविधान...; राहुल गांधींच्या 'त्या' विधानावर उपराष्ट्रपती नाराज
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत मायक्रोफोन बंद करण्याबाबत लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावर मौन बाळगले तर ते घटनेसाठी चुकीचं ठरेल, असं सूचक विधान उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड़ यांनी केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार करण सिंह यांनी लिहिलेल्या मुंडक उपनिषदावरील पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना जगदीप धनखड यांनी लंडनमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर सविस्तर भाष्य केले. जग आपल्या ऐतिहासिक कामगिरीचे आणि कार्यक्षम, गतिमान लोकशाहीचे कौतुक करत आहे. खासदारांसह आपल्यापैकी काही जण विचार न करता आपल्या लोकशाही मूल्यांचा नाहक अवमान करत आहेत. "
लोकसभेत काम करणारे विरोधी पक्षातील खासदार बोलत असताना अनेकदा मायक्रोफोनवर बंद केले जातात, असे राहुल गांधी यांनी सोमवारी लंडनमध्ये ब्रिटीश खासदारांना सांगितले होते. भारतीय वंशाचे विरोधी पक्ष लेबर पक्षाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी हाऊस ऑफ कॉमन्सच्या ग्रँड कमिटी रूममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांनी आपल्या भाषणात म्हटले की, तथ्यहीन आणि बनावट घटनेला आपण कसे योग्य ठरवू शकतो. G-२० चे अध्यक्ष मिळणे भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे. मात्र देशातील काही लोक आम्हाला बदनाम करण्याचे काम मोठ्या उत्साहाने करत आहेत. आपल्या संसदेला आणि राज्यघटनेला कलंकित करण्याच्या अशा चुकीच्या प्रयत्नंकडे दुर्लक्ष करणे अत्यंत गंभीर आणि चुकीचं ठरेल.
कोणतीही राजकीय रणनीती किंवा पक्षपाती भूमिका आपल्या राष्ट्रवाद आणि लोकशाही मूल्यांशी तडजोड करणे योग्य ठरवू शकत नाही. मी एका महान आत्म्यासमोर आहे. जर मी यावर गप्प राहिलो तर मी घटनेच्या चुकीच्या बाजूने असेन. हा घटनात्मक दोष आणि माझ्या शपथेचा अपमान ठरेल, असंही धनखड यांनी म्हटलं.