
G-20 Summit : जी-२० प्रतिनिधींनी पाहिला छत्रपती शिवरायांचा जीवनप्रवास; गेटवे ऑफ इंडियावर झाला लाईट अँड साऊंड शो
भारतात सध्या जी-२० परिषद सुरू आहे. या परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींनी सोमवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. यावेळी मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच, छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास दाखवणारा लाईट अँड साऊंड शो देखील आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन
यावेळी जी-२० प्रतिनिधींना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दही हंडी, ढोल-ताशा आणि लावणीचा समावेश होता. जी-२० च्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची तिसरी बैठक सोमवारी पार पडली. त्यानंतर या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास
जी-२० प्रतिनिधींना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेता यावा यासाठी विशेष लाईट अँड साऊंड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गेटवे ऑफ इंडियाच्या भिंतींवर प्रोजेक्ट करून शिवरायांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला. (G-20 delegates witness Chhatrapati Shivaji Maharaj's life journey)
ढोल-ताशाची भुरळ
जी-२० प्रतिनिधींना या कार्यक्रमात ढोल-ताशाची भुरळ पडली. त्यांनी पारंपारिक मराठी नृत्यामध्ये सहभागी होत, ढोल आणि ताशा वाजवून पाहिला. महाराष्ट्राची संस्कृती पाहून जी-२० प्रतिनिधी भारावून गेले होते.
दरम्यान, जी-२० प्रतिनिधींच्या (G-20 Delegates) बैठकीत विज्ञान, तंत्रज्ञान, नवकल्पना, प्रभावी आणि सर्वसमावेशक धोरण आणि प्रशासनाशी निगडीत आव्हाने यासंबंधी चर्चा करण्यात आली. यासोबतच, राष्ट्रीय आणि प्रादेशिक ब्लू इकॉनॉमीच्या प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी वित्त यंत्रणा उभारण्यासंबंधी पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले.