गडकरी प्रयोगा'तून काम आणि बचतही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

हमरस्त्यांसाठी नद्यांतील दगड-माती; जलस्रोत पुनरुज्जीवीत

नवी दिल्ली ः महामार्गांची कामे करताना लागणारा मुरूम, माती, दगड हे साहित्य बाहेरून आणण्यापेक्षा या रस्त्याच्या कामाच्या आसपास असणारे नदी-नाल्यांतील गाळ काढून हे साहित्य रस्त्याच्या कामात वापरण्याची कल्पना केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्षात आणली आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भातील खामगाव भागात त्यांनी त्याचा पहिला प्रयोग यशस्वीपणे राबवला. पैशाची बचत करणारा आणि त्याच वेळी बुजलेले नद्या-नाले पुनरुज्जीवित करणारा हा प्रयोग देशभरात राबवावा, अशा सूचना गडकरी यांनी दिल्या आहेत. 

रस्ते आणि महामार्गांच्या कामात माती, मुरूम, दगड हे वापरले जाते. त्यासाठी याआधी खरेदी केली जात असे. मात्र, गडकरी यांनी केलेल्या सूचनेनुसार खामगाव जिल्ह्यात आसपासच्या बुजलेल्या किंवा कोरड्या पडलेल्या नद्या, नाले आणि तलावांचा उपयोग करावा, त्यातील माती, गाळ रस्त्याच्या कामासाठी वापरावा, अशा सूचना गडकरी यांनी केल्या. त्यामुळे रस्त्याच्या खर्चात तर बचत होतेच; पण नद्या-नाल्यांचा आणि तलावांचे, तसेच त्यातल्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवनही नकळतपणे होते. 

मिळालेल्या माहितीनुसार ज्या खामगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या कामात हा नवा प्रयोग राबवण्यात आला, त्या भागात 27 तलाव आणि बारा छोट्या नद्यांचे उत्खनन केले गेले. त्यातून तब्बल तीस लाख 75 हजार घनमीटरची माती आणि मुरूम मिळाल्याने रस्त्यांचा खर्च तर वाचलाच; पण या भागातील जलस्रोतांची पाणी साठवण्याची क्षमता तब्बल 1075 टीसीएमने वाढली. त्यामुळे पावसाळ्यात त्यात पाणी साठेल व त्याचा लाभ काही गावे व 38 पाणीपुरवठा योजनांनाही मिळणार आहे. 

मधनिर्मितीसाठी रूपरेषा 
गडकरी यांनी आज कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, समाजकल्याण मंत्री थावरसिंह गेहलोत आणि आदिवासी विकासमंत्री अर्जुन मुंडा यांच्याबरोबर संयुक्त बैठक घेऊन मध्यम आणि लघु उद्योग मंत्रालयातर्फे आदिवासी भागात मधमाशा पालनासाठी आणि मधाच्या निर्मितीसाठी एक समन्वित योजना तयार करण्याची रूपरेषा तयार केली. भारतीय मधाला आंतरराष्ट्रीय बाजारात अतिशय चांगला भाव मिळतो. याद्वारे मधनिर्मिती वाढवून आदिवासींनाही मधमाशा पालनासाठी जास्त उद्युक्त करण्याचा हेतू सफल होईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Gadkari experiments Work and akso savings