चप्पलमार सेना खासदाराची ढकलण्याचीही होती तयारी

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

नवी दिल्ली - शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यास निव्वळ चपलेनेच मारले नाही; तर त्याला विमानाच्या शिडीवरुन खाली टाकून देण्याची तयारीही दर्शविल्याची माहिती विमानामधील एका हवाईसुंदरीने दिली आहे. या कर्मचाऱ्यास शिडीवरुन खाली ढकलून देण्याचा आव आणताना गायकवाड यांना एअर इंडियाच्या इतर कर्मचाऱ्यांवर दबाव आणावयाचा होता, असे या हवाईसुंदरीने आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

गायकवाड व व्यवस्थापकामधील संवाद योग्य पद्धतीने न झाल्याने हा प्रसंग घडल्याचे तिने स्पष्ट केले. दरम्यान, गायकवाड यांना विमान कंपन्यांनी काळ्या यादीत टाकल्यानंतर त्यांनी घरी परतण्यासाठी रेल्वेने प्रवास करावा लागला. 

गायकवाड यांना फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने (एफआयए) पाच कंपन्यांच्या विमानांत त्यांना तिकीटच न देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. यामुळे आता रेल्वेने प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर उरला नाही.

एअर इंडियाच्या आर. सुकुमार या संबंधित अधिकाऱ्याने गायकवाड यांचे वर्तन "सडकछाप' होते, असे सांगून त्यांच्याविरुद्ध पोलिस कारवाईच झाली पाहिजे, असे ठामपणे सांगितले आहे. "मारहाण करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, अशी कोणाची समजूत होऊ नये, यासाठी गायकवाड यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,'' असे या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.

Web Title: Gaikwad almost threw Sukumar down a ladder!