भाजप नेत्याच्या कॉलेजचा "टॉपर' गणेशकुमार विद्यार्थी

उज्ज्वलकुमार
मंगळवार, 6 जून 2017

भाकपच्या (मा-ले) चौकशी अहवालानुसार, जवाहरप्रसाद यांनी नाममात्र, दाखवण्यापुरते महाविद्यालय स्थापन करून तेथे आपल्या मर्जीतल्या मंडळींच्या कर्मचाऱ्यांपासून प्राध्यापकपदांपर्यंत नियुक्‍त्या केल्या. अशा महाविद्यालयांना सरकार अंशदान देते. महाविद्यालयाच्या निकालानुसार अंशदान मिळते..

पाटणा - बिहारमधील "टॉपर' विद्यार्थ्यांबाबत रोज नवी माहिती सामोरी येत आहे. यंदा अव्वल क्रमांक मिळालेल्या गणेशकुमारने ज्या महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला, ते महाविद्यालय भाजपच्या एका नेत्याचे आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्‍सवादी-लेनिनवादी) चौकशी पथकाने काढलेल्या माहितीतून हे सत्य उघड झाले.

गणेशकुमारने ज्या महाविद्यालयातून अव्वल क्रमांक मिळवला, ते महाविद्यालय भाजपचे एक नेते जवाहरप्रसाद सिंह यांचे असल्याचे कळते. राज्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत हे जवाहरप्रसाद समस्तिपूर जिल्ह्यातील कल्याणपूरमधून रिंगणात उतरले होते. समस्तिपूरपासून काही अंतरावर असलेल्या चकहबीब येथेही रामनंदनसिंह जयदीप नारायण इंटर महाविद्यालय नावाचे दुसरे महाविद्यालयही जवाहरप्रसाद यांचेच आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य अभितेंद्रकुमार हे जवाहरप्रसाद यांचे चिरंजीव आहेत. पोलिस आता या प्राचार्यांच्या शोधात आहेत.

भाकपच्या (मा-ले) चौकशी अहवालानुसार, जवाहरप्रसाद यांनी नाममात्र, दाखवण्यापुरते महाविद्यालय स्थापन करून तेथे आपल्या मर्जीतल्या मंडळींच्या कर्मचाऱ्यांपासून प्राध्यापकपदांपर्यंत नियुक्‍त्या केल्या. अशा महाविद्यालयांना सरकार अंशदान देते. महाविद्यालयाच्या निकालानुसार अंशदान मिळते. यंदा या महविद्यालयात बनावट प्रवेश करून इंटरच्या वर्गासाठी 648 विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यात आले. त्यातील 165 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याच महाविद्यात गणेशकुमार होता आणि तो चक्क "टॉपर' झाला. आता त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.

"टॉपर'ला "लाडू' (तुरुंगवास) मिळाला आहे.
- लालूप्रसाद यादव, राजदचे अध्यक्ष

Web Title: Ganesh Kumar learnt in college owned by BJP leader