New Delhi : तृतीयपंथीयांनीही केला ‘बाप्पा‘ चा गजर ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganeshotsav

New Delhi : तृतीयपंथीयांनीही केला ‘बाप्पा‘ चा गजर !

नवी दिल्ली : गणेशोत्सवात दिल्लीतील नॉर्थ एव्हेन्यू भागातील एका बंगल्यात त्यादिवशी वेगळेच वातावरण होते.. उपस्थितांपैकी खास निमंत्रित लक्ष वेधून घेत होते... आपल्या ‘खर्जा‘तील विशिष्ट आवाजात ‘त्यांनी‘ गणेश आरती व गणपती बाप्पा चा गजर केला आणि त्यांच्याच डोळ्यांत टचकन पाणी आले....ते होते काही तृतयपंथीय.... समाजाकडून भेदभावाची आणि हीन वागणूक अनुभवायला मिळणाऱया तृतीयपंथीयांच्या या प्रतीनिधींना गणेश आरतीचा मान देण्याचा हा योग भाजप नेते सुनील देवधर यांच्यामुळे जुळून आला होता.

देवदर यांनी यंदा आपल्या सरकारी निवासस्थानी ‘समरसता गणेशाची‘ प्रतिष्ठापना केली होती. त्यात दहा दिवस रोज समाजातील शोषित, पीडीत, वंचित वर्गातील बांधवांना बोलान त्यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्याचा उपक्रम त्यांनी राबविला आहे. आरतीला मोठी गर्दी होते.‘ आमच्याकडील जागा छोटी असली तरी मन मोठे आहे,‘ असे देवधर सांगतात. गणेशाच्या दर्शनाला येणाऱयांना खास उकडीच्या मोदकांचा प्रसादही दिला जातो. मात्र कितीही मोठ्या पदावरील व्यक्ती आली तरी आरतीचा मुख्य मान हा शोषित व वंचित घटकांनाच देणार असा देवधर यांचा निश्चय आहे.

त्यानुसार त्यांनी तृतीयपंथीयांच्या हस्ते रात्रीची आरती केली. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे स्वामी जितेंद्रानंद सरस्वती, अयोध्येतील राममंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यात मान मिळालेले कामेश्वर चौपाल, भाजप अनुसूचीत जाती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंह आर्य आदी उपस्थित होते. त्याआधीच्या दिवशी मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी आरती केली होती.

देवधरांकडील आरतीत सहभागी झालेल्या तृतीयपंथीयांच्या प्रतीनिधींमध्ये रेश्मा(पाटणा) साधना मिश्रा व मीरा (ओरिसा), हिरा (दिल्ली), रेश्मा,व रानी (पाटणा), रवीना व वरीहा (छत्तीसगड) यांचा सहभाग होता. देवधर यांच्या सुरात सूर मिसळून हे सारेजण ‘शेंदूर लाल चढायो‘ व इतर आरत्या म्हणत होते. आरतीनंतर मंत्रपुष्पांजली वाहताना हिरा व मीरा यांचे डोळे भरून आले.

सकाळ शी बोलताना त्यांनी सांगितले, ‘‘आमच्या भगिनींची जागा अगदी महाराष्ट्रातही बाप्पाच्या मंडपांच्या बाहेर असते. आम्हाला कोणी आत येऊ देत नाही, हिडीसफिडीस करतात. आज खुद्द दिल्लीत बाप्पांच्या आरतीचा मान आम्हाला मिळणे हे आमचे मागच्या जन्मीचे भाग्य आहे. तृतीयपंथीयांच्य हक्कांसाठी लढण्यास यामुळे हुरूप आला आहे.‘‘ रामायण- महाभारतातही उल्लेख असलेल्या किन्नरांच्या प्रतीनिधींचा रामजन्मभूमी प्रकल्पात किन्नरांचाही सहभाग व त्यांना स्थान असावे अशी आमची विनंती असल्याचे त्यांनी स्वामी जितेंद्रानंद यांना सांगितले. आम्हाला कॉंग्रेस-भाजप यांच्याशी देणेघेणे नाही. हिंदू धर्मरक्षण व मनुष्य निर्माण यांचाच आम्ही विचार करतो व प्रामाणिक किन्नरांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत असे स्वामीजींनी सांगितले.

Web Title: Ganeshotsava New Delhi North Avenue Ganesh Festival Ganesh Aarti

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..