गंगा घाटावर अवधूत साधूंना नागा संन्यासाची दीक्षा

गंगा घाटावर अवधूत साधूंना नागा संन्यासाची दीक्षा

कुंभनगर (प्रयागराज) : कुंभमेळ्यात मौनी अमावास्येला दुसऱ्या शाही स्नानानंतर जुना आखाड्यात अवधूत साधूंना नागा संन्यासाची दीक्षा देण्याचा कार्यक्रम गंगेच्या घाटावर झाला. स्वतःचे पिंडदान केल्यानंतर अवधूत संन्यासी झाले. 

पंच दशनाम जुना आखाड्यातर्फे सुमारे 100 साध्वी आणि 900 अवधूतांसह एक हजार जणांना संन्यासाची दीक्षा देण्यात आली. याआधी जुना आखाड्याकडून सुमारे दोन हजार अवधूत व दीड हजार साध्वींना संन्यासाची दीक्षा देण्यात आली. आखाड्याच्या कोतवालांच्या देखरेखीखाली गंगेच्या किनाऱ्यावर दीक्षा समारंभ झाला. या वेळी गंगा स्नान, भस्म स्नान, गोमूत्र स्नान, पंचगव्य स्नान करून पुन्हा गंगा स्नानानंतर सर्व अवधूतांना नवीन लंगोट देण्यात आले. परंपरेनुसार यज्ञोपवित धारण केल्यानंतर त्यांना पलाश लाकडाचा दंड आणि मातीचे कमंडलू प्रदान करण्यात आले.

काशीचे पुरोहित डॉ. रवीशंकर तिवारी, जितेंद्र मणि त्रिपाठी, संतोष आणि उज्जेनचे संजय बघेरा यांच्या पौरोहित्याखाली सर्वांनी स्वतःचे पिंडदान केले. पंच दशनाम आखाड्यातील छावणीत जुना पीठाधीश्‍वर आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्या नेतृत्वाखाली वसंत पंचमीच्या स्नानपर्वाच्या मुहूर्तावर सर्व संन्याशांना नागा बनविण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ता महंत विद्यानंद सरस्वती यांनी दिली. 

किन्नर आखड्यात महामंडलेश्‍वरपद 

कुंभमेळ्यातील दुसऱ्या स्नानपर्वानंतर किन्नर आखाड्याने विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या आखाड्यातील छावणीत झालेल्या संस्कारविधींनंतर आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी दिल्लीच्या महंत पूजा आणि सोनिया यांना महामंडलेश्‍वरची पदवी बहाल केली. 

किन्नर आखाड्याचा लवकरच अजून विस्तार केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. किन्नर आखाड्यात आता बारा महामंडलेश्‍वर किंवा मंडलेश्‍वर, 36 पीठाधीश्‍वर आणि 60 महंत आहेत. 12 फेब्रुवारीला अनेक राज्यांमध्ये किन्नर आखाड्याच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com