
Bill Gates : कोरोना काळातील भारताच्या योगदानाचे गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, मोदींच्या...
नवी दिल्ली - मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी आरोग्य, विकास आणि हवामान या सारख्या क्षेत्रात भारताच्या प्रगतीचे कौतुक केले आहे. तसेच नाविन्यपूर्ण प्रकल्पात गुंतवणूक केल्यास काय शक्य होतं हे भारताने दर्शवलं आहे.
बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सहअध्यक्ष बिल गेट्स यांनी अनेक सुरक्षित, प्रभावी आणि परवडणारी लस विकसित करण्याच्या अद्भुत क्षमतेबद्दल भारताचे कौतुक केले. ते म्हणाले की, या लसींनी कोविड -19 च्या जागतिक महामारीदरम्यान लाखो लोकांचे प्राण वाचवले. जगभरात इतर रोगांचा प्रसार रोखला. गेट्स यांनी भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी ट्विट करून म्हटलं की, “बिल गेट्स यांना भेटून त्यांच्यासोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून आनंद झाला. तर गेट्स एका लेखात म्हणाले, "जेव्हा जग अनेक आव्हानांना तोंड देत आहे, अशा वेळी भारतासारख्या गतिमान आणि सर्जनशील ठिकाणी प्रवास करणे प्रेरणादायी आहे.
गेट्स म्हणाले की, कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे गेल्या तीन वर्षांत त्यांनी फारसा प्रवास केला नाही, परंतु ते मोदींच्या संपर्कात राहिले. कोविड लस विकसित करणे आणि भारताच्या आरोग्य प्रणालींमध्ये गुंतवणूक करणे या मुद्द्यांवर, ते म्हणाले की जीवन वाचवणाऱ्या लसींच्या उत्पादनाव्यतिरिक्त, भारताने त्यांच्या वितरणातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने कोविड लसींचे २.२ अब्ज पेक्षा जास्त डोस वितरित केले आहेत.