सप-बसप युती तुटण्याच्या मार्गावर; आगामी निवडणूक मायावती स्वबळावर लढणार?

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जून 2019

उत्तर प्रदेशात भाजपने सप आणि बसप यांचा दारुण पराभव करत दणदणीत यश मिळवलं. बसप प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या 11 जागांसाठी होणारी पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बसप ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लखनौ- उत्तर प्रदेशात भाजपने सप आणि बसप यांचा दारुण पराभव करत दणदणीत यश मिळवलं. बसप प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या 11 जागांसाठी होणारी पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बसप ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या 10 वर्षांपासून बसपने एकही पोटनिवडणूक लढवलेली नाही. पण यावेळी ही भूमिका बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मायावती यांनी निकालानंतर पहिल्यांदाच पक्षाची बैठक घेतली आणि युतीचा कोणताही फायदा झाला नसल्याचं सांगितलं. यादवांची मतं मिळाली नाही. जर ही मतं मिळाली असती तर सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या कुटुंबातलेच लोक हरले नसते. सपच्या कित्येक लोकांनी युतीविरोधात काम केलं. मुस्लिमांनी आपल्याला पूर्ण साथ दिली, असं मायावती यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील अनेक आमदार खासदार म्हणून निवडून गेले आहेत. दोन्ही सभागृहांसाठी निवड झाल्यानंतर एक जागा रिक्त करणं अनिवार्य आहे. रिक्त जागेवर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेतली जाते. उत्तर प्रदेशातील अनेक आमदार हे खासदार झाल्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे. रामपूर सदर, जलालपूर, बलहा, जैदपूर, माणिकपूर, गंगोह, प्रतापगड, गोविंद नगर, लखनौ कँट, टुडला, इगलास, हमीरपूर या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gathbandhan Over? Mayawati Says BSP Will Fight Bypolls Alone