गौरी लंकेश हत्येप्रकरणी आणखी एका संशयितास अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

2008 पासून एच. एल. सुरेश गोव्यातील हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असून, तेव्हापासून कर्नाटकातील तुमकुर भगात राहत होता. एसआयटीने हिंदू जनजागृती समितीच्या वेबसाईटवरील त्याचे उल्लेख व दहा वर्षांपासून सुरेशने कर्नाटकातील तरुणांना हिंदुत्ववादी विचारांबद्दल दिलेली व्याख्याने आणि इतर उपक्रमांबाबतचे पुरावे गोळा केले आहेत. 

नवी दिल्ली : पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणात कर्नाटक एसआयटीने आणखी एका संशयित आरोपीला गुरुवारी अटक केली आहे. एच. एल. सुरेश असे आरोपीचे नाव आहे. हत्येच्या कटातील मुख्य आरोपी सुजित कुमार ऊर्फ प्रवीण व संशयित मारेकरी परशुराम वाघमारे यांना एच. एल. सुरेश याने स्वतःचे घर भाड्याने राहायला दिले होते. आपल्याला या कटाची काही माहिती नव्हती असे सुरेशने एसआयटीला सांगितले. मात्र कटात त्याचा सहभागही असल्याचे पुरावे सापडले आहेत, असे एसआयटी सूत्रांनी सांगितले. 

2008 पासून एच. एल. सुरेश गोव्यातील हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असून, तेव्हापासून कर्नाटकातील तुमकुर भगात राहत होता. एसआयटीने हिंदू जनजागृती समितीच्या वेबसाईटवरील त्याचे उल्लेख व दहा वर्षांपासून सुरेशने कर्नाटकातील तरुणांना हिंदुत्ववादी विचारांबद्दल दिलेली व्याख्याने आणि इतर उपक्रमांबाबतचे पुरावे गोळा केले आहेत. लंकेश यांच्या हत्येनंतर त्याच रात्री सुजित कुमार व परशुराम वाघमारे यांनी सुरेशचे भाड्याने घेतलेले घर सोडले व सुरेशने मारेकऱ्यांचे हेल्मेट आणि इतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे एसआयटीच्या तपासात समोर आल्याचे एसआयटी सूत्रांनी सांगितले. 

प्रथमदर्शनी याप्रकरणात एच. एल. सुरेशला साक्षीदार करावे, असे एसआयटीला वाटले. मात्र, सखोल तपासात त्याचा हत्येच्या कटात त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. एसआयटी सूत्रांनी सांगितले. एच. एल. सुरेशचे या प्रकरणातील संशयित सूत्रधार अमोल काळेसोबत अनेक वर्षांपासून संबंध असल्याचे तपासातून पुढे आल्याचे एसआयटी सूत्रांनी सांगितले.

Web Title: Gauri Lankesh Murder Case one suspect arrested